Manoj Jarange : मोठी बातमी! अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे यांची मोठी घोषणा
Manoj Jarange : उपोषण सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला राज्याचे मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे यांची भेट घेतली.

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी उद्यापासून (30 मे) बेमुदत उपोषण सुरू करण्यावर आपण ठाम असल्याचे स्पष्ट करत मराठा आंदोलक मनोज जारंगे यांनी शुक्रवारी राज्य सरकारवर मराठा समाजाची “अग्निपरीक्षा” घेत असल्याचा आरोप केला. ओबीसी मंत्रालयाच्या धर्तीवर मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे राज्याचे मंत्री तथा मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जारंगे यांची भेट घेतली. यावेळी कुणबी प्रमाणपत्र वितरणाच्या प्रक्रियेसंदर्भात सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती विखे पालटील यांनी दिली. मात्र, मराठा समाजाचे दाखले शोधण्यासाठी स्थापन केलेल्या शिंदे समितीकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याचा आरोप जारंगे यांनी केला.
त्यांनी महिनाभरातच काम सोडले –
“फारसी, उर्दू आणि मोडी लिपीतील दस्तऐवज वाचण्यासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांना वेतनच देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी महिनाभरातच काम सोडले,” असा दावा जारंगे यांनी केला. सारथी योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी तसेच कुणबी प्रमाणपत्रे तातडीने द्यावीत, अशी मागणीही त्यांनी केली.
विखे पाटील यांनी सांगितले की, कुणबी प्रमाणपत्र वितरणासाठी शासनाने कार्यपद्धती (एसओपी) तयार केली असून त्याची प्रत जारंगे यांना दिली जाणार आहे. “प्रमाणपत्र वितरणाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा करणार आहे,” असे ते म्हणाले. फेब्रुवारीपासून आतापर्यंत ६१ हजार प्रमाणपत्रे वितरित केल्याची माहितीही त्यांनी दिली.
उन्हाच्या तडाख्यात उपोषण –
दरम्यान, शनिवारी अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय जारंगे यांनी कायम ठेवला आहे. “हे आंदोलन आतापर्यंतचे सर्वांत कठीण आणि अभूतपूर्व असेल,” असा इशाराही त्यांनी दिला. उन्हाच्या तडाख्यात कोणतेही छप्पर न घेता उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत बोलताना जारंगे म्हणाले, “मला उपोषणाची हौस नाही. मात्र, सत्ताधारी मराठा समाजाची क्रूर अग्निपरीक्षा घेत आहेत. आंदोलन दडपण्याची भाषा आणि अहंकार आता थांबवावा. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिंमत असेल तर दोन दिवस तरी माझ्यासारखे मे महिन्याच्या उन्हात बसून दाखवावे.”
गेल्या दहा महिन्यांपासून सरकार मराठा आरक्षणाबाबत केवळ वेळकाढूपणा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “विद्यार्थ्यांना ना प्रमाणपत्रे मिळत आहेत, ना वैधता मंजुरी. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे,” असे ते म्हणाले.
समोरासमोर चर्चा करण्यास तयार –
मराठा आंदोलनादरम्यान दाखल गुन्ह्यांच्या संदर्भात सरकारशी समझोता झाल्याचे सांगत, “सुमारे १,५०० पैकी ८०० गुन्हे मागे घेण्याचे मान्य झाले होते. आता केवळ ६४ गुन्हे शिल्लक असल्याचे सरकार सांगत आहे. या मुद्द्यावर आम्ही समोरासमोर चर्चा करण्यास तयार आहोत,” असे जारंगे यांनी नमूद केले.
मुख्यमंत्र्यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात काळे झेंडे दाखवणाऱ्या मराठा तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “तरुणांमध्ये संताप आहे. आंदोलन अधिक आक्रमक होणार नाही, याची खबरदारी सरकारने घ्यावी,” असा इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्रात महायुती सरकार सत्तेत येण्यासाठी मराठा समाजाने मोठ्या प्रमाणावर मतदान केले, मात्र आता त्याच समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप जारंगे यांनी केला. “तुम्ही राजकारण, निवडणुका आणि उमेदवारी वाटपात व्यस्त आहात. सामान्य माणसाला आनंदी कधी करणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर…
दरम्यान, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल असा कोणताही निर्णतय घेल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. “ओबीसी समाज सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे,” असे त्यांनी सांगितले.





