यशवंतनगर : वडोली निळेश्वर (ता. कराड) येथील ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरुद्ध व ग्रामसेविका पुष्पा कोळी यांच्यावरील कारवाईसाठी सुरु असलेले धरणे आंदोलन विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांच्या पुढाकाराने स्थगित करण्यात आले. ग्रामसेविका पुष्पा कोळी यांच्या मनमानी कारभाराविरोधात गावातील अविनाश डुबल, अक्षय डुबल, हणमंत पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले होते. बोगस ग्रामसभेच्या ठरावाने अपात्र केलेल्या लाभार्थ्यांची घरकुले पात्र करून मंजुरी मिळावी किंवा ग्रामसेविका कोळी यांच्याकडून घरकुलांची रक्कम वसूल करून द्यावी, ग्रामसेविकेवर कठोर कारवाई करणे, ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सीसीटीव्ही बसवणे या प्रमुख मागण्यासाठी तीन दिवसांपासून आंदोलन सुरु होते. आमदार मनोज घोरपडे यांनी आंदोलनास भेट देऊन संबंधितांवर कडक कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले. ग्रामस्थांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीचे दप्तर सील करण्याची सूचना आमदार घोरपडे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना केली. त्यानुसार लगेचच ग्रामपंचायतीचे दप्तर सील करण्यात आले. मनोज घोरपडे म्हणाले, ग्रामसेवकांचे कामकाज शासनाच्या मूल्यमापनावर परिणाम करतात. त्यामुळे ग्रामसेवकांनी कामांमध्ये हलगर्जीपणा करू नये. कोणाच्याही राजकीय दबावाला बळी न पडता आपले काम प्रामाणिकपणे पार पाडावे. यामध्ये इथून पुढे चुकीचे काही जाणवल्यास निश्चितच त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. ग्रामसेविका पुष्पा कोळी यांची वेतनवाढ रोखली आहे. आठ ते दहा दिवसांत चौकशी पूर्ण करून यामध्ये दोषी आढळणाऱ्या सर्वांवर कार्यवाही केली जाईल., असे गटविकास अधिकारी प्रताप पाटील यानी सांगितले. यावेळी माजी उपसरपंच दयानंद पवार, अमोल पवार, महेश चव्हाण, मोहन चव्हाण, कृष्णत चव्हाण, निलेश पवार, हनुमंत पवार, अविनाश डुबल, अक्षय डुबल, प्रजल पवार, गणेश पवार, अक्षय पवार, सुहास पवार, वैभव माने, सुरेश पाटील, अक्षय वाघमारे व ग्रामस्थ उपस्थित होते. वडोली निळेश्वर येथील घरकुल अपात्र प्रकरण गंभीर असून याप्रकरणी अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा.अधिकाऱ्यांनी योग्य कारवाई केली नाही तर येत्या पावसाळी अधिवेशनात वडोली निळेश्वर ग्रामस्थांचे प्रश्न विधानसभेत मांडणार. – मनोज घोरपडे (आमदार, कराड उत्तर)