पुणे | पर्यावरणाचे संरक्षण हा विकासाचा भाग : डाॅ. धुमाळ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जलसुरक्षा हे फक्त सरकारचे काम नाही, तर प्रत्येक नागरिकाची ती जबाबदारी आहे. येणाऱ्या काळात पाणीटंचाईची समस्या भीषण होऊ नये, यासाठी याकडे गांभीर्याने पाहून पाणी बचतीबाबत व्यापक जनजागृती व्हायला हवी, असे मत जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ. हनुमंत धुमाळ यांनी व्यक्त केले. विकास म्हणजे केवळ मानवाला मिळणाऱ्या सोयीसुविधा नव्हेत, तर पर्यावरणाचे संरक्षण हाही महत्वाचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे चॅप्टरच्या वतीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीओईपी) बांधकाम क्षेत्राशी संबंधित घटकांसाठी आयोजित परिसंवादात डॉ. धुमाळ बोलत होते. याप्रसंगी जीवित नदी संस्थेच्या संस्थापिका शैलजा देशपांडे, तसेच असोसिएशनचे महेश बांगड, सुनील मते, अजय गुजर, राजाराम हजारे, शशिकांत किल्लेदार पाटील, संजय आपटे आदी उपस्थित होते.
देशपांडे म्हणाल्या, नद्यांच्या बाजूला अनैसर्गिक झाडांची लागवड करण्याऐवजी नैसर्गिकरित्या उगवणारी स्थानिक वनस्पती हटवू नये. मानवाला लागणारा सर्वांत जास्त ऑक्सिजन हा वातावरणामधून तसेच समुद्रभागातून येतो. जो समुद्र तथा नद्यांमधील वनस्पतींमध्ये तयार होतो. त्यामुळे नद्यांमध्ये स्थानिक आणि नैसर्गिक जलीय वनस्पती असणे महत्वाचे आहे. पाणी साठवून ते वर्षभर वापरता यावे, यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.
बांगड म्हणाले, प्रत्येक साइटवरील पाणी वापराचे बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर ऑडिट व्हावे. त्यामुळे बांधकामाला लागणाऱ्या पाण्याचा अंदाज येईल. यामुळे पाणी वाया जाणार नाही. इतर देशांप्रमाणे बांधकाम क्षेत्र व कंपन्यांना देण्यात येणाऱ्या पाण्यावर निर्बंध आणावेत. पाण्याचा पुनर्वापर सक्तीचा करावा. त्यामुळे पाण्याचा वापर, पाणी प्रदूषण या दोन्ही गोष्टींना आळा बसेल व पर्यावरणाची हानी होणार नाही.




