प्रभात वृत्तसेवा पवनानगर – नववर्षाच्या जल्लोषाला शिस्तीची आणि इतिहासाच्या संवेदनशीलतेची जोड देत महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संरक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान यांच्या वतीने ३१ डिसेंबर २०२५ ते १ जानेवारी २०२६ या कालावधीत राज्यातील तब्बल २४३ गडकिल्ल्यांवर एकाचवेळी खडा पहारा ही राज्यव्यापी मोहीम राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील गडकिल्ले हे केवळ पर्यटनस्थळ नसून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे, स्वराज्याच्या संकल्पनेचे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे जिवंत प्रतीक आहेत. मात्र अलीकडच्या काही वर्षांत नववर्षाच्या काळात या गडकिल्ल्यांवर होणारे मद्यपान, असभ्य वर्तन, तोडफोड, अनधिकृत वास्तव्य तसेच प्लास्टिक कचऱ्यामुळे ऐतिहासिक वारशाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर गडकिल्ल्यांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी खडा पहारा मोहिमेची आखणी करण्यात आली आहे.ही मोहीम स्थानिक ग्रामपंचायती, पोलीस प्रशासन, वनविभाग, राज्य पुरातत्त्व विभाग तसेच स्थानिक शिवप्रेमी आणि गडप्रेमी यांच्या समन्वयाने राबविण्यात येणार आहे. प्रत्येक गडकिल्ल्यावर शिस्तबद्ध पद्धतीने स्वयंसेवक आणि जबाबदार घटकांचा पहारा ठेवण्यात येणार असून, नियमबाह्य किंवा संशयास्पद प्रकार आढळल्यास तत्काळ प्रशासनाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येणार आहे.त्याचबरोबर या मोहिमेअंतर्गत पर्यटक आणि नागरिकांमध्ये ईतिहासाची जाणिव आणि वारसा संवर्धनाची जनजागृती करण्यात येणार आहे. गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि नागरिकांची जबाबदारी याविषयी माहिती देत, गडांवर स्वच्छता आणि शिस्त राखण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. प्लास्टिकमुक्त गडकिल्ले, मद्यपानमुक्त परिसर आणि वारशाचे जतन हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या उपक्रमात गडकिल्ल्यांवर प्रेम करणाऱ्या शिवप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. “३१ डिसेंबर २०२५ ते १ जानेवारी २०२६ या कालावधीत गडकिल्ल्यांवर पहिल्यांदाच खडा पहारा ही राज्यव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. गडकिल्ल्यांवर होणारे मद्यपान, असभ्य वर्तन, तोडफोड, प्लास्टिक कचरा, अनधिकृत वास्तव्य आणि ऐतिहासिक वारशाचे नुकसान रोखणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.” – योगेश सोनवणे, संस्थापक, गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य