Property Registration: दस्तनोंदणीसाठी आधार ओळख हवीच! जमीन व्यवहारांतील फसवणूक टाळण्यासाठी शासनाचा निर्णय
Property Registration: दुय्यम निबंधक कार्यालयातील 'स्किप'चा पर्याय रद्द; खोटे पक्षकार आणि बनावट ओळखपत्रांमार्फत होणाऱ्या फसवणुकीला बसणार आळा.

Property Registration- स्थावर मालमत्तांच्या दस्तनोंदणीसाठी गुरुवारपासून (दि. १) आधारकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. खरेदी- विक्री, गहाणखत, वाटणी यांसह ६३ प्रकारच्या दस्तनोंदणीसाठी आधार ओळख आवश्यक राहणार आहे. खोटे पक्षकार व साक्षीदार उभे करून होणाऱ्या फसवणुकीला यामुळे आळा बसणार आहे. राज्यात दरवर्षी काही लाख दस्तांची नोंदणी होते.
मात्र, दस्तनोंदणी करताना आतापर्यंत आधार कार्ड बंधनकारक नव्हते. त्यामुळे खरेदीदार आणि विक्रेत्यांची ओळख पटविण्यासाठी कोणताही ठोस पर्याय नव्हता. त्यातून बनावट आधारकार्ड जोडून फसवणूक झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. आधार कार्ड जोडणे ऐच्छिक असल्याने दुय्यम निबंधकांनाही दस्त नोंदवून घेताना ‘स्किप’चा पर्याय वापरण्याचा अधिकार दिला होता.
मात्र, मध्यंतरी स्किप पर्यायाचा वापर करून दस्तनोंदणीमध्ये गडबड केल्याचे समोर आले. त्यामुळे नोंदणी विभागाने मागील काही महिन्यांपूर्वीच शासनाकडे सादर केलेल्या आधारकार्डबाबतच्या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिली आहे.
“आधार क्रमांक नसलेल्या व्यक्तींना आधार नोंदणीची पावती, अन्य सरकारी ओळखपत्रे आणि संबंधित नाते सिद्ध करणारी कागदपत्रे सादर करावी लागतील. पडताळणीनंतरच व्यवहार अंतिम केला जाईल. बालक व पात्र लाभार्थ्यांना केवळ आधार नसल्याने दस्तनोंदणीपासून वंचित ठेवले जाणार नाही.”
– चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री





