Satara | जिल्ह्यात उद्योग व पर्यटनवाढीला चालना द्या

सातारा, (प्रतिनिधी) – जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग व पर्यटन क्षेत्राच्या वाढीला विशेष चालना द्यावी, पर्यटनवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये परदेशी पर्यटक आकर्षित करण्यासाठीही प्रयत्न करावेत, असेही निर्देश राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी दिले. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मॉडेल स्कूल, स्मार्ट पीएचसी उपक्रमांचे राज्यपालांनी कौतुक केले.
येथील शासकीय विश्रामगृहात राज्यपाल राधाकृष्णन यांनी अधिकाऱ्यांची प्रशासकीय बैठक घेतली. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन,
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांचे स्वागत केले. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा, प्रकल्पांचा आढावा घेत राज्यपालांनी शिक्षण, आरोग्य, पर्यटन विकास, बांबू लागवड, महिला सुरक्षा आदी सर्व विषयांबाबत मार्गदर्शन केले.
जिल्हा परिषदेच्या 225 शाळांमध्ये राबविण्यात येत असलेल्या मॉडेल स्कूल उपक्रमाची माहिती घेतली. 2027 पर्यंत प्रत्येक गावात एक मॉडेल स्कूल करण्यात येणार आहे.
अशा प्रकारच्या उपक्रमांबाबत आपण पहिल्यांदाच ऐकत असून हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे, अशा शब्दात त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. जिल्ह्यात स्त्रियांचे साक्षरतेचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत जवळपास 13 टक्के कमी आहे.
मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरजही त्यांनी व्यक्त केली. पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी एकात्मिक, धार्मिक, ऐतिहासिक व पर्यावरणपूरक पर्यटन विकास आराखडा राबविण्यात येत असून यासाठी शासनाने 700 कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. साताऱ्यात वर्षाला येणाऱ्या सुमारे 15 लाख पर्यटकांपैकी किती परदेशी असतात याची विचारणा त्यांनी केली.
परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी केली. जिल्ह्यातील 84 प्राथमिक आरोग्य केंद्रे स्मार्ट करण्यात येत आहेत. या उपक्रमाबद्दलही त्यांनी अभिनंदन केले.
जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या बांबू लागवड, मॉडेल अंगणवाडी प्रकल्प, टसर सिल्क प्रकल्प, कार्य गुणवत्ता संनियंत्रण प्रणाली यासह जिल्हा वार्षिक आराखडा, जिल्ह्याची सर्वसाधारण माहिती या सर्व बाबींविषयी सविस्तर माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
राज्यपालांनी घेतली शिष्टमंडळांची भेट
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी येथील विश्रामगृहामध्ये विविध क्षेत्रांतील शिष्टमंडळांची भेट घेतली.
यामध्ये राजकीय पक्षांचे व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, क्रीडा, औद्योगिक, पत्रकारिता, बांधकाम व्यावसायिक, बार असोसिएशन, कृषी आदी क्षेत्रातील प्रतिनिधींची भेट घेऊन जिल्ह्यातील विविध प्रश्न, समस्या जाणून घेतल्या.
यामध्ये मेडिकल कॉलेज पूर्ण क्षमतेने सुरु व्हावे, सिंचन योजना, औद्योगिक विकास, पुनर्वसनाचे प्रश्न, सैनिकांसाठी ट्रेनिंग सेंटर, वडूज येथील हुतात्म्यांचे स्फूर्तीस्थान, शहरातील पार्किंग प्रश्न, अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती व्हावी, जातीधर्मांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी,
किल्ल्यांचे संवर्धन व्हावे, कोल्हापूर खंडपीठ निर्मीती व्हावी. सेंद्रिय कृषी उत्पादन निर्यातीबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे आदी प्रश्नांचा समावेश होता.





