Drug Syndicate Arrest : पोलिसांची मोठी कारवाई! एमडी ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, १ कोटी १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
Drug Syndicate Arrest : कुरकुंभ येथील २०१६ च्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपीच्या मदतीने ग्रामीण पुण्यात ड्रग्ज कारखाना सुरू करण्याचा होता मोठा कट.

Drug Syndicate Arrest – शहरासह ग्रामीण भागात एमडी (मॅफेड्रॉन) अमली पदार्थाचे जाळे विस्तारण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पर्दाफाश करण्यात वाघोली पोलिसांना मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १ कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून २२५ ग्रॅम एमडी ड्रग्ज, महागड्या कार आणि इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
वाघोली पोलिसांनी दि. १६ एप्रिल २०२६ रोजी रात्री जोगेश्वरी वजनकाटा, थेऊर रोड, केसनंद येथे सापळा रचून अनिस शम्मू सय्यद (२८, रा. मांजरी बुद्रुक) आणि हरी उत्तम उफाडे (३५, रा. वाघोली) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून ५ ग्रॅम ५ मिलीग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान सुमित घुले आणि त्याचा साथीदार आकाश ढवळे हे पुणे शहरासह लोणीकंद, कोरेगाव भीमा, शिक्रापूर, कारेगाव, रांजणगाव आणि शिरूर परिसरात एमडी ड्रग्जची विक्री करीत असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, कुरकुंभ येथील २०१६ च्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विपीनकुमार पंडित याच्या मदतीने ग्रामीण भागात एमडी तयार करण्याचा कारखाना सुरू करण्याचा त्यांचा कट असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी मुख्य सूत्रधार सुमित घुले याला अहमदाबाद येथून अटक केली. त्यानंतर रामनिवास बिश्नोई याला खराडी येथून ६३.६२ ग्रॅम एमडीसह पकडण्यात आले. आकाश ढवळे याच्याकडून कारेगाव येथे १५९ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. एमडी उत्पादनासाठी मदत करणारा विपीनकुमार पंडित यालाही हडपसर परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी बीएमडब्ल्यू, स्विफ्ट, ग्लॅन्झा यांसारख्या महागड्या वाहनांसह एकूण १ कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी ग्रामीण भागात मोठे ड्रग्ज सिंडिकेट उभे करण्याच्या तयारीत असल्याचे तपासात समोर आले असून, पोलिसांनी त्यांचे मनसुबे उधळून लावले आहेत.
या कारवाईचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चंदन यांनी केले. पोलीस अंमलदार प्रदीप मोटे, शेखर शिंदे, विशाल गायकवाड, गहिनीनाथ बोयणे, महादेव कुंभार आणि राहुल तुपारे यांच्या पथकाने ही धडक कारवाई पार पाडली.






