Pune Drugs Case : पुणे ड्रग्जच्या विळख्यात! आयटी हब ते पब पार्ट्यांपर्यंत जाळं; धक्कादायक आकडेवारी समोर
Pune Drugs Case : सोशल मीडिया ठरतोय तस्करीचं मुख्य केंद्र; 'सांकेतिक भाषा' आणि 'डिजिटल पेमेंट'च्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढण्याचे षडयंत्र.

Pune Drugs Case – शहरात अमली पदार्थांचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत (एनडीपीएस) नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या, अटक आरोपी आणि जप्त केलेल्या अमली पदार्थांची किंमत यामध्ये मागील पाच वर्षांत मोठी वाढ झाली आहे. अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट महाविद्यालय परिसर, आयटी हब, पब पार्टी आणि झोपडपट्टी वसाहतींपर्यंत पोहोचल्याने तरुण पिढीमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे.
पुणे पोलिसांनी यापूर्वी विश्रांतवाडीपासून कुरकुंभ, दिल्लीपर्यंत छापेमारी करून आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पुन्हा त्याच धर्तीवर धडक कारवाई करण्याची गरज आहे. विद्यार्थी, आयटी कर्मचारी आणि तरुणांची मोठी लोकसंख्या असलेले शहर अमली पदार्थ हब होण्याचा धोका आहे. अमली पदार्थ तस्करांकडून युवा पिढीला लक्ष्य केले जात आहे.
महाविद्यालयीन परिसर, विश्रांतवाडी, कोंढवा, हडपसर, वाकड, हिंजवडी, खराडी, कोरेगाव पार्क, विमाननगर परिसरात अमली पदार्थांचे जाळे पसररले आहे. विशेष म्हणजे, पारंपरिक गांजा-चरसपेक्षा सिंथेटिक ड्रग्ज, एमडी (मेफेड्रोन), पार्टी ड्रग्ज आणि ऑनलाइन माध्यमातून होणारी विक्री वाढत आहे. पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखा,
अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (एएनटीएफ), तसेच एनसीबीच्या संयुक्त कारवायांत गेल्या काही वर्षांत अनेक रॅकेट उद्ध्वस्त केली आहेत. पोलिसांनी गतवर्षी सुमारे साडेतीन हजार कोटींहून अधिक किमतीचे मेफेड्रोन जप्त करत आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला होता. अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने कर्नाटकातील बंगळूरमध्ये छापे टाकून नुकतेच एमडी ड्रग्जचे तीन कारखाने उद्ध्वस्त केले.
तरीही हायड्रोपोनिक गांजा, मेफेड्रोनची विक्री होत असल्याचे दिसून येत आहे..तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, केवळ पोलिसी कारवाई पुरेशी ठरणार नाही. महाविद्यालयीन स्तरावर जनजागृती, पालक आणि शिक्षकांचा सक्रिय सहभाग, पुनर्वसन केंद्रांची क्षमता वाढविणे आणि सायबर गुन्हेगारांवर करडी नजर ठेवणे या उपाययोजनांची गरज आहे.
तस्करीसाठी सोशल मीडिया
सोशल मीडियाचा वापर करून अमली पदार्थ पोहोचवले जात आहेत. पोलिसांची नजर चुकविण्यासाठी एखाद्या ठिकाणी माल ठेवून देवाणघेवाण करण्याची (डेड ड्रॉप) पद्धत आणि डिजिटल अॅप्सवर सांकेतिक भाषेचा वापर करून विक्री केली जात आहे. या बाबी पोलीस तपासात समोर आल्या आहेत.
पोलिसांनी अमली पदार्थ माफियांविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे. तपासात तांत्रिक दोष राहणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. ज्याचा फायदा आरोपींना न्यायालयात होणार नाही. कायद्याची कडक अंमलबजावणी, सामाजिक जागृती आणि तरुणांना योग्य मार्गदर्शन या त्रिसूत्रीवरच शहराला ड्रग्जमुक्त ठेवता येईल.
– अॅड.अभिषेक हरगणे, फौजदारी वकील





