Pune Crime News – पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून मित्रानेच साथीदारांच्या मदतीने मित्राचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांच्या आत खुनातील आरोपींना अटक केली. शुभम राजेश शिंदे (२५, रा. सिंहगड रोड, नांदेड सिटी, पुणे), लकी सुरेंद्र सिंग (२३, रा. खडकी ॲम्युनेशन फॅक्टरी, पुणे) , सुनील संतोष खलसे ऊर्फ एस.के. (१९, रा. संभानगर झोपडपट्टी, कर्वेनगर, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. एक विधीसंघर्षित बालकाचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे उघड झाले आहे.वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक बेवारस मृतदेह सापडला होता. वारजे पोलिसांसोबत गुन्हे शाखा एककडून समांतर तपास सुरू होता. पोलीस अंमलदार बाळू गायकवाड व साई कारके यांना खबर मिळाली की, वारजे परिसरात गणपती माथा ते शिंदे पूल येथे दोघे जण संशयास्पदरीत्या उभे आहेत. तत्काळ पथक तेथे गेले असता, पोलिसांची चाहुल लागताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशीत आरोपींनी कबूल केले की, त्यांनी राजेंद्र सुभाष ऐलगच्चे (रा. स्वराज आर्केड, आंबेगाव, पुणे) याला बुधवारी रात्री आकाशनगर शनि मंदिर टेकडी येथे पैसे देण्याच्या कारणावरून बोलावून घेतले होते. त्यानंतर लोखंडी हत्याराने गळा, छाती, पोट, पायावर वार करीत तसेच डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून केला.