‘विद्यार्थ्यांना आरोग्याची काळजी घ्या…’ सांगत असतानाच प्राध्यापकाचा स्टेजवर मृत्यू

Sameer Khandekar – विद्यार्थ्यांना आरोग्याची काळजी घेण्याबद्दल सांगत असतानाच एका प्राध्यपकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. समीर खांडेकर (Sameer Khandekar) असे त्यांचे नाव असून ते आयआयटी कानपूरचे प्राध्यापक आहेत. खांडेकर सीनीयर प्रोफेसर आणि स्टुडंट वेलफेअरच्या डीन पदावर होते. ते व्यासपीठावरून भाषण देत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
तेथे उपस्थित असलेल्यांना थोडा वेळ काही समजलेच नाही. नंतर खांडेकर यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. तथापि, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शुक्रवारी आयआयटीच्या एका कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. आरोग्य चांगले कसे राखावे याबाबत ते बोलत होते.
हे बोलत असतानाच त्यांना अचानक त्रास सुरू झाला आणि काही वेळ ते खाली बसले. ते भावूक झाले असल्याचे तेथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना अगोदर वाटले. अगोदर कोणाच्या काहीच लक्षात आले नाही. मात्र काही वेळाने खांडेकर घामाने डबडबल्याचे दिसून आले आणि ते तेथेच बेशुध्द झाले.
दरम्यान, पूर्ण तपासणी केल्यानंतरच नेमके काय झाले हे सांगू शकतो असे डॉक्टरांनी म्हटले आहे. ब्लॉकेजमुळे मृत्यू झाला आहे की हृदयक्रिया बंद पडून त्यांचा मृत्यू झाला याची तपासणी केली जाते आहे. ५५ वर्षीय खांडेकर यांचे शिक्षणही आयआयटी कानपूर येथेच झाले होते व त्यानंतर त्यांनी जर्मनी येथे पीएचडी केली होती. त्यांच्या नावावर आठ पेटंट आहेत.





