Pune district : मंचरमध्ये तीन प्रभागात समस्या कायम; रस्ते, पाणी आणि सुरक्षिततेसाठी मतदार प्रतिक्षेत

मंचर : मंचर नगरपंचायतीच्या पूर्वेकडील पुणे-नाशिक महामार्गाच्या पलीकडे वसलेले प्रभाग क्रमांक चार, पाच आणि सहा हे सध्या मोठ्या प्रमाणात विकसित होत असलेले परिसर मानले जातात. मात्र, या भागातील नागरिकांना अद्याप मूलभूत सोयीसुविधांच्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः रस्त्यांची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि रात्रीच्या वेळी सुरक्षिततेचा अभाव या समस्या गंभीर बनल्या आहेत.
अनेक सोसायट्यांमध्ये पाणीपुरवठा अपुरा असल्याने नागरिकांना वारंवार खाजगी टँकरच्या माध्यमातून पाणी खरेदी करून तहान भागवावी लागत आहे. या परिस्थितीमुळे सदनिकाधारक आणि सामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरपंचायतीकडून पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जात असले तरी लोकसंख्येच्या वाढीमुळे तो अपुरा पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.या भागातील रस्त्यांची स्थिती देखील चिंताजनक आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडून प्रवास कष्टदायक बनतो.
रात्रीच्या वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे आणि बाभळीची झुडपे असल्याने अंधारात पादचारी आणि दुचाकीस्वारांना बिबट्या किंवा इतर प्राणिमात्रांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेसाठी पुरेशा प्रकाशव्यवस्थेची आणि झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याची मागणी केली आहे. या ठिकाणी सिमेंट रस्ते झालेले आहे.
तसेच काही ठिकाणी नळाद्वारे पाणीपुरवठा नियमित होत असला तरी पुरेसा नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नगरपंचायतीने या भागात रस्ते, पाणी आणि प्रकाशव्यवस्था सुधारण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे सांगितले असले तरी नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष फायदा झालेला दिसत नाही. मंचरच्या या वेगाने वाढणाऱ्या प्रभागांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.





