संगमनेर, (प्रतिनिधी) – भाजप व महायुती सरकारने सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला असून त्यांचे नाव घेण्याची पात्रता यांची नाही. महाराष्ट्रात तोडून फोडून आलेले सरकार हे जनतेला मान्य नाही. महाराष्ट्रातील अनेक उद्योग या सरकारने गुजरातला पळविले असून देशात व राज्यात महागाईचा दहशतवाद वाढला असल्याची टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली. शिर्डी मतदारसंघातही मोठा दहशतवाद आहे. काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून येथील दहशतवाद संपवा, असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी यांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन त्यांच्याविषयी दोन शब्द चांगले बोलण्याचे आव्हान दिले. त्यावर भावाला दिलेले चॅलेंज बहिणीने शिर्डीत पूर्ण केले. प्रियंका गांधी यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदरपूर्वक बोलून पंतप्रधान मोदींना नवीन चॅलेंज दिले. पंतप्रधान मोदींनी जातीय जनगणना करण्याचे जाहीर करावे, आरक्षणाची 50 टक्के मर्यादा काढून टाकण्याचे खुले चॅलेंज शिर्डीत दिले. शिर्डी येथील प्रचार सभेत प्रियंका गांधी यांनी भाजप व महायुती सरकारवर हल्लाबोल केला. प्रारंभी प्रियंका गांधी यांनी जनसमुदायासमोर ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा देताच उपस्थित तरुणांनीही त्यांच्या घोषणांना प्रतिसाद दिला. व्यासपीठावर आ.बाळासाहेब थोरात, खा.भाऊसाहेब वाकचौरे, उमेदवार हेमंत ओगले, कोपरगावचे उमेदवार संदीप वर्पे, नानासाहेब कारले, बाळासाहेब गायकवाड, पैलवान रावसाहेब खेवरे, रणजितसिंह देशमुख, डॉ.जयश्री थोरात, मिलिंद कानवडे, सुहास वहाडणे, सहप्रभारी बीएम संदीप, आमदार रिटा चौधरी, तेलंगणाच्या मंत्री सीताक्का, सचिन गुजर, करण ससाणे आदींसह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. आ.थोरात म्हणाले, राहाता मतदारसंघांमध्ये मोठी दहशत आहे. येथे विकास थांबलेला आहे. माझे खुले आव्हान आहे की, चर्चा समोरासमोर होऊन जाऊ द्या. घोगरे म्हणाल्या, शेतकर्याची मुलगी असल्याने या दहशतीविरुद्ध आवाज उठविला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात गांधींचे अभूतपूर्व स्वागत काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव प्रियंका गांधी या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रथमच आल्या. महाराष्ट्रात त्यांची ही पहिलीच प्रचार सभा झाली. त्यांची सभा ऐकण्यासाठी सुमारे 50 हजारांच्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होते. यावेळी तरुणाईने केलेले स्वागत अभूतपूर्व होते.