Priyanka Gandhi : उत्तर प्रदेश कॉंग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार; प्रियांका गांधीकडे पुन्हा सूत्रे सोपवली जाणार?

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या उत्तर प्रदेश शाखेमध्ये व्यापक बदल होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेत्या आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा पुन्हा एकदा या राज्याचा कार्यभार स्वीकारू शकतात असा दावा काही माध्यमांतून केला जात आहे. एवढेच नाही तर राज्य शाखेमध्ये वरपासून खालपर्यंत मोठे बदल होऊ शकतात असेही वृत्तांमध्ये म्हटले आहे.
उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी एक विधान केले आहे. एका वाहिनीशी बोलताना अजय राय म्हणाले की, प्रियांका आमच्या नेत्या आहेत. आम्ही त्यांचे स्वागत करतो. आम्ही आमच्या नेत्यासोबत पूर्ण ताकदीने उभे आहोत, आम्ही त्यांना पुढे घेऊन जाऊ. त्या संपूर्ण देशाच्या नेत्या आहेत आणि काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत आहे.
या संभाषणादरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पोस्टरवर त्यांचे छायाचित्र लावून मार्केटिंग करत आहेत, कुठेही लष्करी अधिकाऱ्यांचा उल्लेख नाही. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांवर तसेच महिला लष्करी अधिकाऱ्यांवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांवर शाब्दिक हल्ला करताना राय म्हणाले की, त्यांना यांचे अश्रू दिसत नाहीत, त्यांना लाज वाटली पाहिजे. त्यांना प्रत्येक गोष्टीत मार्केटिंग करावे लागते.
ते म्हणाले की, ते तिरंगा यात्रेत डीजे वाजवत आहेत, त्यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांचे दुःख दिसत नाही. गुजरातमधील पंतप्रधान मोदींच्या रोड शोवर टीका करताना ते म्हणाले की, बनारसचे लोकही त्यांना शोधत आहेत. याशिवाय, राज्यातील आगामी पंचायत निवडणुकांबाबत राय यांनी मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, आम्ही पंचायत निवडणुका एकट्याने लढू. आम्हाला जनतेकडून खूप प्रेम आणि पाठिंबा मिळत आहे, आम्ही मोठ्या संख्येने आमची उपस्थिती नोंदवू.





