Priyanka Gandhi : सत्ताधारी पक्षाचे लोक सभागृह चालवू इच्छित नाहीत; प्रियांका गांधी यांचा सरकारवर आरोप

नवी दिल्ली : लोकसभेत विरोधी पक्षाच्या नेत्यांना सभागृहात बोलू दिले जात नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला सभागृहाचे कामकाजच चालवायचे नाही, असे प्रतिपादन काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी-वड्रा यांनी म्हटले आहे. त्यांनी आणि सोनिया गांधी यांच्यासह इतर विरोधी खासदारांनीही बिहारमध्ये मतदार यादीच्या सुधारणेच्या मुद्द्यावर संसदेच्या आवारात निदर्शने केली.
संसद परिसरात माध्यमांशी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की ‘जेव्हा जेव्हा विरोधी पक्षनेत्याला सभागृहात बोलायचे असते तेव्हा त्यांना बोलू दिले जात नाही. आम्ही चर्चेची मागणी करत आहोत आणि त्यांनी ही मागणी मान्य करावी. गेल्या अधिवेशनात, सत्ताधारी पक्षाने सभागृहात गोंधळ सुरू केल्याचे पाहून मला आश्चर्य वाटले. त्यांनी एक मुद्दा हातात घेतला जेणेकरून विरोधक त्यावर प्रतिक्रिया देतील. त्यामुळे गोंधळ झाला आणि सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. जर त्यांना हे योग्य वाटले तर ठीक आहे.
विरोधी पक्ष ऑपरेशन सिंदूर, पहलगाम दहशतवादी हल्ला, बिहारमधील मतदार यादीतील सुधारणा यावर सभागृहात चर्चेची मागणी करत आहे. सरकारने सांगितले आहे की पुढील आठवड्यात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होईल, परंतु विरोधी पक्ष बिहार मुद्द्यावर चर्चा करण्याच्या मागणीवर ठाम आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसदेच्या आवारातही निदर्शने केली. सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि अनेक विरोधी खासदार या निदर्शनात सहभागी झाले होते.





