Priyanka Gandhi Palestine Bag: ‘पॅलेस्टाईन’चा उल्लेख असलेली पिशवी घेऊन प्रियांका गांधी संसदेत; भाजपाने साधला निशाणा….

Priyanka Gandhi Palestine Bag : काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा आज (सोमवारी) खास बॅग घेऊन संसदेत पोहोचल्या. ज्यावर ‘पॅलेस्टाईन’ असे लिहिले होते. ही बॅग पॅलेस्टाईनला त्यांचा पाठिंबा आणि गाझामधील इस्रायलच्या लष्करी कारवाईविरोधातील त्यांची भूमिका दर्शवत होती. प्रियंका गांधी यांनी यापूर्वीही अनेकदा पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ आवाज उठवला आहे. पॅलेस्टाईनला पाठिंबा दिल्याबद्दल भाजपने प्रियंका गांधींना धारेवर धरले आहे.
पॅलेस्टाईनचे चिन्ह असलेली बॅग :
प्रियंका गांधींच्या बॅगेवर इंग्रजीत ‘पॅलेस्टाईन’ लिहिलेले होते आणि पॅलेस्टाईनशी संबंधित चिन्हेही होती, ज्यात टरबूजाचे चित्र होते. हे टरबूज पॅलेस्टिनी लोकांच्या संघर्षाचे आणि एकतेचे प्रतीक मानले जाते. गेल्या आठवड्यात नवी दिल्लीतील पॅलेस्टिनी दूतावासाचे प्रमुख अबिद अलराझाक अबू जझार यांनी प्रियंका गांधी यांची भेट घेतली. केरळमधील वायनाड येथून अलीकडेच झालेल्या निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांनी प्रियंकाचे अभिनंदन केले होते.
भाजपने दर्शवला तीव्र विरोध :
प्रियंका गांधींच्या या निर्णयाला भाजपने तीव्र विरोध दर्शवला आहे. भाजप खासदार गुलाम अली खटाना यांनी याला ‘मथळे मिळवण्याचा प्रयत्न’ म्हटले आहे. ते म्हणाले, “जनतेने त्यांना नाकारले की ते असे प्रकार करायला लागतात.”
प्रियांका गांधींचा पलटवार :
प्रियांका गांधी यांनी भाजपच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना सांगितले की, बांगलादेशात हिंदू आणि ख्रिश्चनांवर होत असलेल्या अत्याचारांवरही सरकारने चर्चा करावी. ते म्हणाले, “बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचा मुद्दा सरकारने उपस्थित करून पीडितांना पाठिंबा द्यावा.” असं त्या म्हणाल्या.
इस्त्रायलविरोधात प्रियांकाची भूमिका :
प्रियंका गांधी यांनी यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या धोरणांवर जोरदार टीका केली होती. त्यांनी गाझामधील इस्रायली लष्करी कारवाईचे वर्णन “नरसंहार” असे केले आणि ते थांबविण्याचे आवाहन केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला या मुद्द्यावरून इस्रायलचा निषेध करण्याचे आवाहन केले.





