Priya Bapat And Umesh Kamat – ‘बिन लग्नाची गोष्ट’ या आगामी मराठी चित्रपटाच्या माध्यमातून मराठीतील लोकप्रिय आणि लाडक्या जोड्यांपैकी एक प्रिया बापट आणि उमेश कामत हे ‘क्युट कपल’ तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून दोघांचे चाहते त्यांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहाण्यासाठी उत्सुक होते आणि अखेर १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून त्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. पोस्टरमधील दृश्यामुळे खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रिया हाताची घडी घालून, मिश्कील चेहऱ्याने उभी आहे. निर्णयावर ठाम असल्याचा आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यावर झळकत आहे. तर उमेश हातात हार घेऊन, डोक्याला मुंडावळ्या बांधून उभा आहे. जणू काही तो लग्नासाठी तयार आहे परंतु, परिस्थिती काहीतरी वेगळी आहे. या सगळ्यांतून स्पष्ट होते की, ही गोष्ट पारंपरिक विवाहसंस्थेच्या बाहेर जाऊन नात्यांची नवी मांडणी करणारी आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, “ही गोष्ट आहे प्रेमाची, नात्यांमधल्या समज गैरसमजांची, वर्षानुवर्षे मनात धरून ठेवलेल्या गाठी सुटण्याची. हा चित्रपट म्हणजे आजच्या काळाचा एक आरसा आहे, ज्यात प्रेक्षकांना स्वतःचं प्रतिबिंब नक्की बघायला मिळेल. काहींना नव्याने प्रश्न पडतील, तर काहींना जुन्याच प्रश्नांची नवीन उत्तरं मिळतील. हलक्या फुलक्या प्रसंगातून मांडलेली ही गोष्ट प्रेक्षकांचं मनोरंजन नक्की करेल.’’