Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ
Nana Patekar : नाना पाटेकर यांचे पूर्ण नाव विश्वनाथ दिनकरराव पाटेकर आहे. त्यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा येथे झाला.

Nana Patekar passes away : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या महान अभिनेत्याच्या एक्झिटने चाहत्यांसह संपूर्ण सिनेसृष्टीला चटका लावला आहे. त्यांच्या अभिनयातील योगदान अतुलनीय मानले जाते.
नाना पाटेकर यांचे पूर्ण नाव विश्वनाथ दिनकरराव पाटेकर आहे. त्यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा येथे झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. वयाच्या अवघ्या १३व्या वर्षापासून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली होती. पुढे आपल्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.
संघर्षाच्या काळात फक्त ३५ रुपये कमाई
नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीदरम्यान आपल्या संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगितलं होतं. त्या काळात परिस्थिती इतकी बिकट होती की, दिवसातून केवळ एकदाच जेवण करून दिवस काढावे लागत होते. त्यांची महिन्याची कमाई अवघी ३५ रुपये होती. मात्र, या कठीण परिस्थितीसमोर त्यांनी कधीही हार मानली नाही. मेहनत, जिद्द आणि अभिनयाच्या जोरावर त्यांनी पुढे कोट्यवधींची संपत्ती आणि अफाट लोकप्रियता मिळवली.
यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही नाना पाटेकर यांचा साधेपणा कायम राहिला. प्रसिद्धी आणि मोठं नाव असूनही त्यांचा वावर नेहमीच साधा राहिला. त्यांच्या बोलण्यात किंवा वागण्यात कधीही बडेजावपणा जाणवला नाही.
‘गमन’पासून सुरू झालेला अभिनयाचा प्रवास
नाना पाटेकर यांनी ‘गमन’ या चित्रपटातून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंकुश’ या चित्रपटाने त्यांना मोठी ओळख मिळवून दिली. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले.
यानंतर १९८८ मध्ये मीरा नायर यांच्या ‘सलाम बॉम्बे’ या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. ही भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरली. त्यानंतर नाना पाटेकर यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
‘परिंदा’मधील अण्णा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात
१९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘परिंदा’ या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली. या चित्रपटातील ‘अण्णा’ ही व्यक्तिरेखा त्यांनी अत्यंत प्रभावीपणे साकारली. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
यानंतर ‘तिरंगा’, ‘क्रांतिवीर’, ‘खामोशी’, ‘भूत’ यांसह अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या. त्यांच्या खास डायलॉग डिलिव्हरीमुळे आणि प्रत्येक भूमिकेला वेगळा रंग देण्याच्या शैलीमुळे नाना पाटेकर यांचा अभिनय इतरांपेक्षा कायमच वेगळा ठरला.
पुरस्कारांनीही गौरवलेलं व्यक्तिमत्त्व
नाना पाटेकर यांच्या अभिनय कारकिर्दीचा गौरव अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी करण्यात आला. त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. २०१३ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या प्रतिष्ठित नागरी सन्मानाने गौरवले.
संघर्षातून सुरुवात करून आपल्या अभिनयाच्या जोरावर कोट्यवधी चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारा हा अभिनेता आजही आपल्या असंख्य अविस्मरणीय भूमिकांमधून प्रेक्षकांच्या स्मरणात राहील.





