पिंपरी (प्रतिनिधी) – पुणे जिल्ह्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी शहरातील खासगी डॉक्टरांशी संवाद साधला. पुणे येथील विधान भवन कौन्सिल हॉलमध्ये शुक्रवारी हे चर्चासत्र पार पडले. यावेळी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील खासगी डॉक्टर उपस्थित होते. यावेळी येणाऱ्या काळामध्ये संभाव्य करोना विषाणूचे रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेता काय उपाययोजना करता येतील याबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी डॉ. देशमुख म्हणाले, समजा शंभर रुग्ण हे करोना पॉझिटिव्ह असतील तर त्यामध्ये साठ हे असिम्टोमॅटिक म्हणजेच माइल्ड लक्षणे असणारी असतील. अशा रुग्णांवर डेडीकेटेड कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येतील. या सेंटरमध्ये प्राथमिक औषधे आणि रुग्णांना देखरेखीखाली ठेवण्यात येईल. तेथे ऑक्सिजन सिलेंडर, रुग्णवाहिका व मेडिसीनचे एमडी डॉक्टर उपलब्ध असतील. म्हणजेच एखाद्या रुग्णाची प्रकृती खालावली तर त्याला पुढच्या सेंटरमध्ये हलवता येईल. यामध्ये फॅमिली फिजिशियन डॉक्टरांचा समावेश असेल.
त्यापुढे उरलेल्या 40 रुग्णांपैकी ज्यांना माइल्ड टू मॉटरेड चिन्ह असतील म्हणजे ताप उतरत नसेल असे 20 रुग्ण असतील असा अंदाज आहे. अशा ठिकाणी प्रत्येक बेडला ऑक्सिजनची सुविधा असेल मात्र व्हेटिलेटर नसेल. उरलेले 20 रुग्ण हे धोकादायक स्थितीत असतील असा अंदाज आहे. त्यांच्यासाठी कोव्हिड रुग्णालय जिथे सर्व सुविधा असतील तिथे अशी सोय करण्यात येईल. त्याठिकाणी एमडी डॉक्टर उपलब्ध असतील.
शहरामध्ये आवश्यकता भासल्यास अशा प्रकारची रचना करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील खासगी डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे. त्या त्या टप्प्यावर त्या त्या प्रकारच्या डॉक्टरांना आपली सेवा द्यावी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी खासगी डॉक्टरांना सरकारी नियमाप्रमाणे सुरक्षेची साधने पुरविली जाणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये निमा संस्थेचे एक हजार दवाखाने आहेत. यापैकी काहींची अडचण वगळता बाकी दवाखाने सुरु आहेत. या दवाखान्यांमध्ये संशयित रुग्ण आला तर जवळच्या कोव्हिड रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. ज्या वेळेस शासनाला आवश्यकता भासेल त्यावेळेस निमा संस्थेचे सर्व सदस्य डॉक्टर त्या त्या टप्प्यावर सेवा देण्यास तयार आहेत. फक्त त्यांना व्यवस्थित सुरक्षेची साधने उपलब्ध झाली पाहिजे. सध्या फॅमिली डॉक्टरांना पीपीई कीट उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीमद्ये काम करणे कठीण आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांना पीपीई कीट उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
– डॉ. सत्यजित पाटील, अध्यक्ष निमा संस्था.