Prithviraj Chavan : “2029 ला नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत”; माजी मुख्यमंत्र्यांचा दावा
Prithviraj Chavan : फडणवीस शिक्षणमंत्री झाले तर विरोध करू - पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan : राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 2029 ला नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असा दावा केला आहे. याशिवाय त्यांनी अमित शाह यांना उपपंतप्रधान व्हायचे असेही म्हंटले आहे. तर मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत स्थान मिळणार असल्याच्या चर्चांवरही पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले आहे.
शुक्रवारी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी आगामी काळात देशात सत्ताबदल नक्की होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. चव्हाण यांनी म्हंटले की, “2029 ला मोदी पंतप्रधान होणार नाहीत. त्यामुळे आता चेहरा बदलण्याचा प्रयत्न आहे. अमित शहा यांना उपपंतप्रधान व्हायचे आहे.
देशात सत्ताबदल कोणत्या राजकीय पक्षामुळे होणार नाही. तर हा बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच होईल. याला कारण त्यांचा गेल्या 12 वर्षातील कारभार आहे.”
तर केंद्रीय शिक्षणमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाल्यास विरोध करणार असल्याची भूमिका देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केली. “सध्या प्रल्हाद जोशी यांच्याकडे सध्या शिक्षणखात्याचा चार्ज दिला आहे. त्यांच्याकडे अगोदरच तीन महत्त्वाची खाती आहेत. त्यामध्ये आता ही नवीन जबाबदारी त्यांना दिली आहे.
शिक्षण खातं हे पूर्णवेळ मंत्र्याची गरज असलेलं खातं आहे, पार्टटाईम खातं नाही. त्यामुळे लवकरच मोदी देशाला चांगला शिक्षणमंत्री देतील, ही अपेक्षा आहे,” असे पृथ्वीराज चव्हाण म्हंटले.
जो विद्यार्थ्यांचे प्रश्न समजावून घेऊन, परीक्षाव्यवस्थेतील गोंधळ कमी करु शकेल, ज्याला मुलभूत शिक्षणाचे प्रश्न माहिती आहेत, अशा शिक्षणमंत्र्याची गरज आहे. पण मोदी सरकारमध्ये तशी एकही व्यक्ती नाही. देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बढती मिळणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
मात्र, फडणवीस शिक्षणमंत्री झाले तर आम्हाला चालणार नाही, आम्ही त्याला विरोध करू. कारण महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर पेपरफुटी झाली आहे. फडणवीस शिक्षण मंत्रीपदासाठी उपयुक्त नसल्याचे चव्हाण म्हणाले.
हेही वाचा:







