Kailas Patil : चुकांमधून धडा घेऊ, जे चुकले त्यांना धडा शिकवू; नगरसेवकांच्या फुटीनंतर आमदार कैलास पाटलांचं वक्तव्य
Kailas Patil : आमदार कैलास पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. याचे कारण म्हणजे त्यांच्याच मतदारसंघात ही घडामोड घडली आहे.

Kailas Patil : संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लढा देऊ, सर्वसामान्यांचा आवाज बनू. शिवसेना ही सत्तेसाठी जन्मलेली नाही, ती सर्व सामान्यांसाठी संघर्ष करण्यासाठी जन्मलेली संघटना आहे. नगरसेवक जरी सोडून गेले असले तरी मतदार सोडून गेलेले नाहीत. धाराशिव हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि तो कायम राहील, ठाकरे कुटुंबाशी शिवसैनिक जोडला गेलेला आहे. त्यामुळे चुकांमधून धडा घेऊ, जे चुकले त्यांना धडा शिकवू , असे वक्तव्य उद्धव ठाकरे गटाचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी नगरसेवक फुटीनंतर केले.
कळंब नगरपरिषदेत मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. ठाकरे गटाच्या १० नगरसेवकांनी मोठा निर्णय घेत भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर येथील स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून राजकीय समीकरणे बदलली आहे. यामध्ये ९ नगरसेवक हे थेट जनतेमधून निवडून आलेले असून यापैकी एक नगरसेवक स्विकृत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या फुटीनंतर कळंब नगरपरिषदेत विरोधी पक्षच राहिलेला नाही. आमदार कैलास पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. याचे कारण म्हणजे त्यांच्याच मतदारसंघात ही घडामोड घडली आहे.
भाजपवर गंभीर आरोप
नगरसेवक फुटीवर भाष्य करताना कैलास पाटील यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले “भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लोकभावना आहे. त्यामुळे अशा निवडून आलेल्या लोकांना आमिष दाखवून फोडाफोडी केली जाते. नगरसेवक फोडून लोकभावना बाजूने होईल, असा भाजपचा समज चुकीचा आहे. तर आगामी काळात आणखी लोकभावना विरोधात जाईल.” असा मोठा दावाही कैलास पाटील यांनी केला.
नेमकं काय घडलं?
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आपल्या हाती धनुष्यबाण घेतला. यानंतर स्थानिक पातळीवर गटातटाचे राजकारण उफाळून आले. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांना गळाला लावण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. हे घडत असताना कळंब नगरपरिषदेतील ठाकरेंच्या नेतृत्वाखालील १० नगरसेवकांनी बंड करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याअगोदर या नगरसेवकांचे भेटीगाठीचे सत्र सुरूच होते. याची कुणकुण उद्धव ठाकरेंना लागल्यानंतर त्यांनी नगरसेवकांना मातोश्रीवर बैठकीला पाचारण केले. मात्र, नगरसेवकांनी बैठकीला दांडी मारली. त्यानंतर १० नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करत आपल्या हाती कमळ घेतले.





