मी सिंचनाची श्वेतपत्रिका काढायला लावली पण… पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठे वक्तव्य

पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवारांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. मी राज्यातील सिंचन प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी जलसंपदा विभागाची श्वेतपत्रिका काढायला लावली होती. त्यात माझा अजित पवारांच्या चौकशी करण्याचा कोणताही उद्देश नव्हता, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
राज्यात सिंचन घोटाळा झाला होता, हे स्वतः पंतप्रधान मोदी यांनीही अनेक वेळा म्हटले. विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या आरोपांमुळे अजित पवारांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला. राज्यातील सिंचन प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी जलसंपदा विभागाची श्वेतपत्रिका काढायला लावली होती. अजित पवार यांची चौकशी करण्यासाठी श्वेतपत्रिका काढावी असा माझा कोणताही उद्देश नव्हता, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
काय आहे नेमका सिंचन घोटाळा ?
1999 ते 2009 या काळात बंधारे आणि सिंचन प्रकल्पांच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला. सिंचनावर 70,000 कोटी रुपये खर्च झाले, पण सिंचन क्षेत्रात केवळ 0.1 टक्क्यांची सुधारणा झाली असं निरीक्षण सरकारच्याच इकोनॉमिक सर्व्हे मध्ये होतं. या काळात अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते.
2001 ते 2011-12 या काळात CAGने जलविभागाचे सात ऑडिट केले. त्यात दीर्घकालीन नियोजनाचा अभाव, प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवण्यात अनिश्चितता, प्रकल्प पूर्ण करण्यास लागलेला वेळ, वन विभागाची परवानगी न घेता काही ठिकाणी प्रकल्प सुरू करणं याबाबतीत नियमांची पायमल्ली झाल्याचं निरीक्षण CAGनं मांडलं होतं.
अनेक प्रकल्पांसाठी नियोजित केलेल्या किमतींमध्ये अनेक पटींनी वाढ झाल्याचं CAGनं म्हटलं. 601 प्रकल्पांपैकी 363 प्रकल्पांची नियोजित रक्कम वाढून 47,427 कोटी रुपयांवर गेल्याचं CAG ने म्हटलं. परंतु आघाडी सरकारने श्वेतपत्रिका काढली होती त्यात अजित पवारांना क्लिन चीट देण्यात आली होती.





