Prithvi Shaw : पृथ्वी शॉचा मुंबई क्रिकेटला रामराम! आता आगामी हंगामात ‘या’ संघासाठी खेळणार

Prithvi Shaw Joins Maharashtra Cricket Team : भारतीय फलंदाज आणि मुंबई क्रिकेट संघाचा खेळाडू पृथ्वी शॉने आता मुंबई क्रिकेट संघाला निरोप दिला आहे. तो गेल्या काही काळापासून मुंबई क्रिकेट संघावर नाराज होता. त्याला संघातून पुरेशा संधी मिळत नव्हत्या. पृथ्वी आता महाराष्ट्र क्रिकेट संघाशी जोडला गेला आहे. येत्या देशांतर्गत हंगामात तो महाराष्ट्राकडून खेळताना दिसेल. महाराष्ट्र क्रिकेट संघाने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
मुंबई क्रिकेट संघाशी नाराजी आणि एनओसी –
पृथ्वी शॉने दुसऱ्या संघाकडून खेळण्यासाठी मुंबई क्रिकेट संघाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) मागितले होते. गेल्या महिन्यात त्याने मुंबई क्रिकेट संघाकडे एनओसीसाठी अर्ज केला होता, ज्याला संघाच्या व्यवस्थापन समितीने मान्यता दिली. शॉला खराब तंदुरुस्ती आणि शिस्तीच्या कारणास्तव मुंबईच्या रणजी संघातून वगळण्यात आले होते. त्याने मुंबईकडून शेवटचा सामना सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशविरुद्ध खेळला होता, ज्याचा अंतिम सामना मुंबईने जिंकला होता.
महाराष्ट्र क्रिकेट संघाचे निवेदन –
#TeamIndia वनडे, T-20 आणि कसोटी या सर्व प्रकारामध्ये प्रतिनिधित्व केलेला स्टार खेळाडू पृथ्वी शॉ चं MCA च्या संघात सहर्ष स्वागत! ऋतुराज गायकवाड, अंकित बावणे, राहुल त्रिपाठी, मुकेश चौधरी, रजनीश गुरबाणी या अनुभवसंपन्न आणि नवोदित खेळाडूंसोबतच पृथ्वी शॉचीही बॅट तळपताना आता क्रिकेट… pic.twitter.com/P4jYyY9lX0
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 7, 2025
महाराष्ट्र क्रिकेट संघाने एक निवेदन जारी करताना म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचा आघाडीचा आक्रमक फलंदाज पृथ्वी शॉने मुंबई क्रिकेट संघाशी संबंध तोडले असून, तो येत्या देशांतर्गत हंगामात महाराष्ट्र क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करेल. या रणनीतिक बदलामुळे महाराष्ट्राचा संघ अधिक बळकट होईल, असे संघटनेने म्हटले आहे. हा बदल भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
हेही वाचा – WI vs SA : वियान मुल्डरचे ऐतिहासिक त्रिशतक! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू
पृथ्वी शॉची प्रभावी कामगिरी –
महाराष्ट्र क्रिकेट संघाने पुढे म्हटले की, पृथ्वी शॉने भारतासाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या आक्रमक फलंदाजीने आणि सामना जिंकवण्याच्या क्षमतेने त्याने सर्वांना प्रभावित केले आहे. देशांतर्गत क्रिकेटसह आयपीएलमधील त्याच्या कामगिरीनेही ही बाब सिद्ध झाली आहे. या बदलामुळे त्याला क्रिकेटर म्हणून पुढे जाण्यास मदत होईल, असे संघटनेने नमूद केले.
हेही वाचा – ICC New CEO : संजोग गुप्ता ICC चे नवे CEO म्हणून नियुक्त; क्रिकेटच्या जागतिक विस्ताराला मिळणार गती!
पृथ्वी शॉ काय म्हणाला?
महाराष्ट्र क्रिकेट संघाशी जोडल्यानंतर पृथ्वी शॉ म्हणाला, “माझ्या करिअरच्या या टप्प्यावर महाराष्ट्र क्रिकेट संघाशी जोडले जाणे मला क्रिकेटर म्हणून पुढे जाण्यास नक्कीच मदत करेल. गेल्या काही वर्षांत मुंबई क्रिकेट संघाकडून मिळालेल्या संधी आणि पाठिंब्यासाठी मी नेहमीच कृतज्ञ राहीन.”





