नाशिकरोड कारागृहात बंदीवानाची आत्महत्या; सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

नाशिक – नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात 58 वर्षीय बंदीवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या शिवदास भालेराव या सिन्नर येथील रहिवाशाने हा टोकाचा निर्णय घेतला. जून 2024 पासून कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या भालेराव याने अचानक गळफास घेतल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
अंमली पदार्थांनंतर सुरक्षा ढिलाई पुन्हा उघड –
या आत्महत्येमुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. काही दिवसांपूर्वीच याच कारागृहातील कैदी अंमली पदार्थ सेवन करतानाचे व मोबाईलवर रील्स शूट करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्या प्रकरणात गुन्हा दाखल होऊनही प्रशासनाने ठोस पाऊले उचलली नसल्याची टीका होत आहे. अल्प काळात घडलेल्या या दोन गंभीर घटनांमुळे कारागृहातील देखरेख आणि अंतर्गत व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडल्याचे दिसून येते.
तणाव आणि तपासाची मागणी –
भालेराव यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी, ते मानसिक तणावात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिकरोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पोलिस आणि कारागृह प्रशासनाने संयुक्त तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि कैद्यांचे जबाब महत्त्वपूर्ण ठरतील.
तज्ज्ञांच्या मते, ही घटना केवळ सुरक्षा त्रुटी नव्हे, तर कारागृहातील कैद्यांच्या मानसिक आरोग्याच्या दुर्लक्षाचे प्रतीक आहे. कारागृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सखोल चौकशीची मागणी केली जात आहे.





