Naval Kishore Ram : 24 तास CCTV ची करडी नजर अन् सुरक्षा व्यवस्था तरीही महागड्या वस्तू गायब?; आयुक्त नवलकिशोर राम काय म्हणाले?

Naval Kishore Ram : चक्क महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातून महागडी उपकरण गायब झाल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुणे महापालिकेच्या आयुक्तांच्या बंगल्यातून महागडी झुंबरे, शोभेच्या वस्तू, टीव्ही, एसी आणि अन्य विद्युत उपकरणे या वस्तू गायब झाल्या आहेत.
सीसीटीव्हीची २४ तास करडी नजर आणि सुरक्षारक्षकांचा पाहारा असतानाही या वस्तू गायब झाल्याच कशा? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. तर दुसरीकडे नव्याने या वस्तू खरेदी करण्यासाठी २० लाख रुपयांच्या निविदांची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती मिळत आहे. आता या प्रकरणी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आयुक्त नवल किशोर राम काय म्हणाले?
या बंगल्यात राहण्यापूर्वी इथं काय साहित्य होते हे मला माहिती नाही. माझ्याकडे भरपूर साहित्य असून आम्ही ते सोबत घेऊन आलेलो आहोत. यापूर्वी आयुक्त राजेंद्र भोसले या ठिकाणी राहत होते. आता ही जबाबदारी निश्चित कुणाची आहे हे आम्ही पाहतो. या संदर्भात एक चौकशी समिती स्थापन करणार आहोत. महापालिका यामध्ये काय झाले याची माहिती घेऊन चौकशी करून कारवाई करेल, अशी प्रतिक्रिया आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे. तसेच ज्याच्यांकडे या बंगल्याच्या देखरेखीची जबाबदारी होती त्याबाबतही त्यांनी भाष्य केले आहे.
कोणत्या वस्तू गायब झाल्या?
आयुक्तांच्या घरातील एसी, झुंबर पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंच्या चित्रांसह अन्य चित्रे, जुन्या काळातील पितळी व कांस्य धातूचे दिवे, दोन मोठे एलईडी टीव्ही, कॉफी मेकर, वॉकीटॉकी सेट, रिमोट बेल्स, चिमणीसह सुसज्ज किचन टॉप, वॉटर प्युरिफायर असे साहित्य या घरात नसल्याचे समोर आले आहे.
बंगला कुठे आहे?
मॅाडेल कॅालनीतील चित्तरंजन वाटिकेशेजारी महापालिका आयुक्तांसाठी मोठा बंगला बांधण्यात आला आहे. या बंगल्यात निवृत्त झालेले आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले राहत होते. त्यांनी हा बंगला सोडल्यानंतर महापालिका आयुक्त नवलकिशोर राम या बंगल्यात राहण्यासाठी येणार असल्याने विद्युत विभागाकडून एसी, टीव्ही, वॉटर प्युरिफायरसह अन्य महत्त्वाच्या वस्तू तातडीने घेण्यात आल्या. अन्य वस्तूंसाठी २० लाख रुपयांच्या निविदेची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे या प्रकरणाची जोरदार चर्चा पुण्यात रंगली आहे.





