पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज शिवाजी पार्क मैदानावर सभा; मराठवाड्यातही तोफ धडाडणार

Maharashtra Assembly Election 2024 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदान येथे जाहीर सभा घेणार आहेत. मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदी आज सभा घेणार आहेत. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे सभेला उपस्थित राहणार नाहीत.
महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज 3 ठिकाणी सभा होणार आहेत. यामध्ये मुंबई, पनवेल आणि छत्रपती संभाजीनगर येथे या सभा होणार आहेत. पंतप्रधान मोदी पनवेलमध्ये दुपारी ४.३० वाजता जाहीर सभेला संबोधित करतील. पंतप्रधानांची आजची शेवटची जाहीर सभा मुंबईत शिवाजी पार्कात सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी मंगळवारी वाहतूक निर्बंधाबाबत मार्गदर्शक तत्वेही जाहीर केली आहेत.
पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंचीही छत्रपती संभाजीनगरात सभा
विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरात आज एकाच दिवशी पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार आहेत. नरेंद्र मोदी यांची सभा सकाळी ११.३० वाजता चिकलठाणा एमआयडीतील ग्रॅहम फर्थ कंपनीच्या मैदानावर होणार आहे.
तर ठाकरे यांची सभा सायंकाळी ६ वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होईल. दोन्ही नेते एकाच दिवशी संभाजीनगर शहरात प्रचारसभा घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी आज नांदेडमध्ये आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत.
हेही वाचा:
पुणे जिल्हा : तीन लाखांपर्यंतचे शेतकर्यांचे कर्ज माफ करणार; शरद पवार यांची ग्वाही





