पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा करणार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

नवी दिल्ली : देशातील दुसऱ्या लॉकडाऊनचा कालावधी संपण्यासाठी केवळ एक आठवडा शिल्लक आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. आज सकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांसह संवाद साधणार आहेत. देशात कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान मोदींची ही तिसरी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत कशाप्रकारे काम करायचे आहे आणि आणखी काय उपाययोजना कराव्या लागतील, यासह 3 मेपर्यंत लागू असलेल्या लॉकडाऊनबाबतही या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.
11 एप्रिल रोजी मागच्या संवादाच्या वेळी अनेक मुख्यमंत्र्यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन, जो 14 एप्रिल रोजी संपणार होता, वाढवण्याची शिफारस होती. त्यानंतर पंतप्रधानांनी 14 एप्रिलला लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. तर त्याआधी पहिल्या लॉकडाऊनच्या घोषणेआधी म्हणजेच 20 मार्च रोजी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत बातचीत केली होती. त्यावेळी मोदींनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनांवर चर्चा केली होती.
केंद्र आणि राज्य सरकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि नागरिकांना काहीसा दिलासा देण्यासाठी विविध ठिकाणी लॉकडाऊनचे नियम शिथिल करत आहे. परंतु कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही राज्ये लॉकडाऊनचा कालावधी 3 मेनंतरही कायम ठेवण्याबाबत आग्रही असल्याचे म्हटले जात आहे.





