“पंतप्रधान मोदी लोकनेते नाहीत तर अभिनेते…”; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं अजब विधान, कॉंग्रेसने केली कोंडी

Rajasthan | Bhajanlal Sharma – राजस्थानमधील जयपूर येथे दोन दिवसांचा आयफा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज्याचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा देखील या सोहळ्याला उपस्थित होते. जेव्हा पत्रकारांनी शर्मा यांना विचारले की त्यांचा आवडता अभिनेता कोण आहे? यावर त्यांनी हसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले.
आता भजनलाल शर्मा यांच्या या उत्तरावर काँग्रेस भाजपवर टीका करत आहे. पंतप्रधान मोदी हे लोकनेते नाहीत तर एक अभिनेता आहेत हे भारतीय जनता पार्टीने मान्य केले आहे अशी टिप्पणी या विषयावरून कॉंग्रेसने केली आहे.
काँग्रेस नेते गोविंद दोतासरा यांनी व्हिडिओ शेअर करत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ‘आम्ही बऱ्याच काळापासून हे सांगत आहोत की मोदीजी नेते नाहीत तर एक अभिनेते आहेत. उशिरा का होईना, भाजप सरकारच्या मुख्यमंत्र्यांनीही मोदीजी हे जननेते नसून अभिनेते आहेत असे म्हणायला सुरुवात केली आहे असे दोतासरा यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले, मोदी कॅमेरा कौशल्य, टेलिप्रॉम्प्टर, पोशाख आणि अलंकारीक भाषेमधील भाषणांमध्ये तज्ज्ञ आहेत. काँग्रेस अनेकदा पंतप्रधान मोदींना त्यांच्या कपड्यांबद्दल आणि भाषणांबद्दल टोमणे मारण्याचे काम करत असते.
दरम्यान, आयफा कार्यक्रमादरम्यान मोठ्या संख्येने बॉलिवूड सेलिब्रिटी जयपूरला पोहोचले होते. जयपूरमध्ये होणाऱ्या आयफाच्या आयोजनाबाबतही काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. आयफासाठी राज्य सरकारने १०० कोटी रुपये दिल्याचा त्यांचा आरोप आहे.
पर्यटन विभागाने ३० कोटी रुपये दिल्याचा त्यांचा आरोप आहे. माजी मंत्री प्रताप खाचरियावास म्हणाले की, सरकारने गरिबांच्या कष्टाने कमावलेले पैसे लुटले आहेत आणि त्यांचे पैसे या कार्यक्रमात गुंतवले आहेत.
राज्यातील लोकांची परिस्थिती वाईट आहे. गाणे आणि नृत्यासाठी १०० कोटी रुपये देण्यात आले आणि चित्रपट कलाकारांसाठी महागड्या हॉटेल्समध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली.





