तब्बल 8 वर्षांनी एकाच मंचावर एकत्र दिसणार पंतप्रधान मोदी आणि शरद पवार; असा असेल मोदींचा पुणे दौरा !

पुणे – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दि. 1 ऑगस्ट रोजीच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्ताची कडेकोट आखणी केली आहे. त्यासाठी पाच हजार पोलिसांचा फौजफाटा पुणे शहर परिसरात तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबादारी असलेले एसपीजीची (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) पथके, एसआपीएफ, फोर्स-वनचे जवान तैनात असणार आहेत. कार्यक्रम स्थळाची बॉम्बशोधक व नाशक (बीडीडीएस) पथकाने पाहणी केली असून, दि. 28 जुलैपासून ते कार्यक्रम होईपर्यंत दौऱ्याचा परिसर “नो फ्लाइंग झोन’ करण्यात आला आहे.
मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटनदेखील होणार आहे. फक्त राजकारणीच नाही तर वैज्ञानिकांचाही यात समावेश आहे. त्यामुळे या कार्यक्रमाबाबत राजकारण करू नये असं आवाहन रोहित टिळक यांनी केलं आहे.
पंतप्रधान मोदी एक ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पुण्यात येतील. त्यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ गणपतीची पूजा करण्यात येईल. दर्शन घेतल्यानतंर पंतप्रधान मोदी 11.45 वाजता लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित राहतील. त्यानतंर पंतप्रधान मोदी 12.45 वाजता मेट्रो ट्रेनच्या विस्तारित मार्गाला हिरवा झेंडा दाखवणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच इतर अधिकारी देखील उपस्थित असणारा आहेत. विशेष बाब म्हणजे, या पुरस्कार सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 8 वर्षांनी एकाच मंचावर दिसणार आहेत. याशिवाय पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवडमधील 1280 घरांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तर पुणे महापालिकेच्या 2680 घरांचे लोकार्पण देखील होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.





