दहशतवाद्यांवर पाकचा खर्च सात लाख कोटी

पंतप्रधान इम्रान खान यांनीच दिली कबुली

इस्लामाबाद – भारतात घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्‍यांना आर्थिक पाठबळासह शस्त्रे पुरवणे आणि दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यात पाकिस्तानचा मोठाच हात असल्याच्या भारताच्या आरोपाला अखेर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीच पुष्टी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांवर अर्थव्यवस्थेतीलच सात लाख कोटी रुपये खर्च केले आहेत, यासाठी अमेरिकेनेच पाकिस्तानला मोठा आर्थिक निधी पुरविल्याचा धक्कादायक खुलासा इम्रान खान यांनी केला आहे.

इम्रान खान म्हणाले, अमेरिका आणि रशियामध्ये शीतयुद्ध सुरू असताना रशियाविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी अमेरिका पाकिस्तानला पैसे पुरवत होती. तर ऐशीच्या दशकात जेव्हा सोव्हिएतने अफगानिस्तानवर कब्जा केला, तेव्हा अमेरिकेच्या सीआयएकडून पाकिस्तानला पैसा पुरविला जात होता. आता अमेरिका त्यांनाच दहशतवादी म्हणत आहे. अमेरिकेपासून तेव्हा तटस्थ राहण्याची भूमिका घेतली असती तर आज पाकिस्तानला इतर देशांचा विरोध पत्करावा लागला नसता, असेही इम्रान म्हणाले.

पाकचे गृहमंत्री एजाज अहमद शाह यांनी दहशतवादी संघटना जमात-उद दावावर कोटयवधी रुपये खर्च केल्याचे कबूल केले त्यानंतर इम्रान खान यांनी हा खुलासा केला आहे. या खुलाशामुळे पाकिस्तान हे एक दहशतावादाला खतपाणी घालणारे राष्ट्र असल्याच्या भारताच्या निष्कर्षांनाही मान्यता मिळाल्याचे मानण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.