हरियाणात गर्व आणि चुकीच्या निर्णयाने काॅंग्रेस बुडाली; राजस्थानचे खासदार हनुमान बेनिवाल यांची टीका

जयपूर : हरियाणासह जम्मू-काशीमरमधील काँग्रेसच्या पराभवासाठी पक्षश्रेष्ठींचा अहंकारी विचार आणि इंडिया आघाडीसोबत निवडणूक न लढण्याचा निर्णय अंगाशी आला आहे. जेव्हा आघाडीच्या पक्षांनी लोकसभा निवडणूक एकत्र लढवली तेव्हा एनडीएने मोठ्या कष्टाने आपले सरकार स्थापन केले होते. असे असतानाही हरियाणा विधानसभा निवडणूक युती करून लढण्यास काँग्रेसने रस दाखविला नाही.
याचे परिणाम काँग्रेसला भोगावे लागले आहेत, अशा तिखट शब्दांत राजस्थानचे खासदार हनुमान बेनिवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बेनिवाल म्हणाले की, हरियाणातील शेतकरी, सैनिक आणि दलित भाजपच्या धोरणांवर आणि कारभारावर असमाधानी आहेत, मात्र काँग्रेसच्या एकजुटीच्या अभावामुळे या वर्गांची निराशा झाली आहे.
या परिस्थितीचा काँग्रेस हायकमांडने गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. लोकशाहीत जनतेचा निर्णय हा सर्वोच्च असतो, पण तरीही काँग्रेस पक्षाने आता आपल्या रणनीतीवर फेरविचार करायला हवा, असेही बेनिवाल यांनी शेवटी जोडले.





