पिंपरी | नवरात्रोत्सवात फळांना मागणी वाढूनही दर स्थिर

पिंपरी, (प्रतिनिधी) – नवरात्रोत्सवामुळे बाजारात विविध प्रकारच्या फळांची मागणी वाढली आहे. डाळिंब, पपई, पेरू, चिकू, सफरचंद, सीताफळ, संत्री व मोसंबी या फळांना जास्त मागणी आहे.
तर डाळींब चिकू व संत्रीवगळता अन्य फळांचे भाव आवाक्यात असल्याचा दिलासा भाविकांना मिळाला आहे. याशिवाय सफरचंद व सिताफळचाी मोठी आवक झाली आहे.
नवरात्रोत्सवात मागणी वाढल्याने पिंपरी फळ बाजारात फळांची मोठी आवक होत आहे. डाळिंबाचे भाव आधीपासूनच तेजीत आहेत. बाजारात दर्जानुसार 200 ते 250 रुपये असे एका किलोचे भाव आहेत. तर नवरात्र सुरू झाल्यापासून भाव 20 टक्क्यांनी वाढले आहेत.
मागील काही दिवसांपासून इतर फळांच्या तुलनेत सफरचंदाचे दर घसरले आहेत.काही दिवसांपूर्वी 200 ते 250 रुपये किलो असलेले सफरचंद आता 100 रुपये किलो दराने विकले जात आहेत. सध्या काश्मीर, सिमलाच्या सफरचंदांचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे तेथून आवक वाढली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यातील मार्केटमधून शिमला, काश्मीरच्या सफरचंंदांची आवक होत आहे. यामध्ये रेड गोल्डन, ग्रीन गोल्डन, रिचड, रॉयल असे सफरचंदाचे चार प्रकारयेत आहेत. काश्मीर येथून आलेल्या सफरचंदाची गोडी अधिक तर खायला नरम आहे. तर सिमला येथील सफरचंद खायला कडक आहेत.
चिकूला मागणी जास्त असल्याने भावात तेजी आहे. पेरूच्या भावातही 20 टक्के वाढ झाली आहे. दर्जानुसार 80 ते 100 रुपये भाव मिळत आहे. सीताफळालाही मागणी वाढली आहे. दर्जानुसार किलोस 50 ते 80 रुपये भाव मिळत आहे.
मागणी वाढल्यामुळे भाव 10 ते 20 टक्क्यांनी वाढले आहेत. याशिवाय पपईला किलोला 20 ते 50 रुपये भाव मिळत आहेे.मागणी वाढल्याने मोसंबी आणि संत्र्याच्या भावात 20 टक्के वाढ झाली आहे.
संत्री प्रतिकिलो 100 ते 150 रुपये तर, मोसंबी दर्जानुसार 50 ते 100 रुपये किलो दराने विक्री होत आहे. केळीची 60 रुपये डझन प्रमाणे विक्री होत आहे. पेअरला मागणी असूनही प्रतिलिोचा दर 200 रुपयांवर स्थिर आहे.





