पिंपरी | पितृपंधरवाड्यात भाज्यांचे दर किंचित वाढले

पिंपरी, ( प्रतिनिधी) – पितृपक्ष सुरु झाल्याने नैवेद्यासाठी लागणाऱ्या विविध भाज्यांची मागणी वाढली आहे. पितृपंधरवाड्यात मेथी, मुळा, आळू, गवार, लाल भोपळा, भेंडी, कारली या भाज्यांचा पित्र जेवणात समावेश करण्यात येत असल्याने या भाज्यांना मोठी मागणी आहे.
पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी घरोघरी नैवेद्य पितृपक्षाची परंपरा जोपासली जाते. तसेच बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने चांगलीच दरवाढ झाली असून, सध्या दोन भाज्या खरेदी करायच्या असतील तर किमान ५० रुपये मोजावे लागत आहेत.
पितृपक्षातील पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी दानधर्म आणि वेगवेगळ्या भाज्यांचा नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे. नैवेद्यात विविध पालेभाज्या आणि फळभाज्यांचा समावेश असतो.
त्यामुळे दरवर्षी पितृपक्षात पालेभाज्यांसह फळभाज्यांनाही मोठी मागणी असते. याच १५ दिवसांच्या कालावधीत लोक पितरांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी श्राद्ध विधी करत असतात.
तसेच गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचे दर तेजीत होते. कोंथिबीर जुडी १००, मेथी जुडी ५० रुपयांवर पोहोचली होती. आता पालेभाज्यांचे दर काही प्रमाणात कमी झाले असले, तरी फळभाज्यांचे दर मात्र तेजीत आहेत.
अनंत चतुर्दशीनंतर सुरु झालेल्या पितृपक्षात पालेभाज्यांसह फळभाज्यांना मागणी वाढली आहे. भाज्यांना मागणी वाढल्याने आणि आवक कमी झाल्यामुळे दर तेजीत आहेत. तसेच येणाऱ्या काळातही नवरात्र व दिवाळी सण असल्याने भाजीपाल्याचा बाजार असाच तेजीत राहण्याची शक्यता भाजी विक्रीते अक्षय दिघे यांनी व्यक्त केली आहे.
पितृपंधरवाड्यात लागणा–या भाज्या आणि दर
मेथी – ३० ते ४०
कोथिंबीर – २० ते ३०
अळू – २५ ते ३५
गवार – १४० ते १६०
मुळा – ३० ते ४०
भेंडी ६० – ८०
कारले ३० ते ५०
टोमॅटो ५० ते ६०
बटाटे ४० ते ६०
हिरवी मिरची ५० ते ७०
लाल भोपळा ४० ते ६०





