वाल्ह्यात श्री संत सावता महाराजांच्या प्रतिमेची बैलगाडीतून ग्रामप्रदक्षिणा वाल्हे – कांदा मुळा भाजी । अवघी विठाई माझी ॥ लसण मिरची कोथंबिरी । अवघा झाला माझा हरि ॥ स्वकर्मात व्हावे रत । मोक्ष मिळे हातो हात ॥ सावत्याने केला मळा । विठ्ठल देखियला डोळा ॥ श्री संत शिरोमणी सावता महाराजांचा 730 वा समाधी पुण्यतिथी सोहळा वाल्हे (ता. पुरंदर) येथील सावतामाळी मंदिर विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. दरम्यान, पारंपरिक पद्धतीने सजविलेल्या बैलगाडीतून श्री संत सावता महाराज प्रतिमेची रंगीबेरंगी फुगे-फुलांनी सजविलेल्या बैलगाडीतून ग्रामप्रदक्षिणा करण्यात आली. टाळ-मृदंगाच्या तालावर सावता महाराज की जय, ज्ञानोबा तुकारामचा जय जय घोषात वाल्हे परिसर दुमदुमून गेला होता. वाल्हे येथील श्री संत सावतामाळी मंदिरामध्ये मागील 69 वर्षांपासून पुण्यतिथी साजरी केली जाते. दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात येते. अखंड हरिनाम सप्ताहासह काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, संत सावता महाराज ग्रंथ वाचन व कीर्तनाच्या कार्यक्रम, जागर आदी धार्मिक आयोजन केले होते. बुधवारी (दि. 23) सांगता समारंभ प्रसंगी सकाळी सावता महाराजांच्या पादुकांना व मूर्तीला दही दुधाने स्नान, अभिषेक घालून विधिवत पूजा करण्यात आली. मोठ्या भक्तीमय वातावरणामध्ये रिमझीम पावसांच्या सरीत वाल्हे गावातील कमळसा मठ श्रीकृष्ण, विठ्ठल, मारुती, ग्रामदैवत श्री भैरवनाथ व महर्षी वाल्मिकी ऋषी मंदिर आदी ठिकाणी अभंग घेत प्रदक्षिणा मारून मिरवणूक श्री संत सावता माळी मंदिरामध्ये आली. यानंतर भोर येथील पंढरीनाथ महाराज गर्जे यांचे काल्याचे किर्तन होऊन संपन्न झाले. दरम्यान, वाल्हे नजिक कामठवाडी,तसेच पिसुर्टी येथेही श्री संत सावता महाराज पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.यावेळी ग्रामस्थांच्या वतीने,महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.