Pune District : मंचरच्या बाजार समितीत मेथीचे बाजारभाव कडाडले

मंचर : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या मेथीचे बाजारभाव कडाडले आहे. 44 रुपये जुडी या भावाने मेथीची विक्री झाल्याची माहिती मंचर बाजार समितीचे सभापती निलेश स्वामी थोरात यांनी दिली.
कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे बुधवार, दि ११ रोजी रात्री भाजीपाला लिलावच्या वेळेस मे. आराध्या ट्रेडिंग कंपनी व गुरुकृपा ट्रेडिंग कंपनी राजू शेठ वाबळे व प्रशांत सैद यांच्या अडत गळ्यावर. सिद्धेश संजय भालेराव कळंब या शेतकऱ्याच्या मेथीला सर्वाधिक उच्चांकी बाजारभाव प्रति जुडी रुपये ४४, असा मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मंचर बाजार समिती येथे चार तालुक्यांमधील शेतीमाल विक्रीसाठी येत असतो, कोथिंबिरीला प्रति जुडी २१ व शेपू प्रतिजुडी २२, असा बाजार भाव मिळाला, शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला मंचर बाजार समिती येथे विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी केले.
गेल्या एक महिन्यापासून चालू असलेल्या पावसामुळे तरकारी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामध्ये विशेषतः धना मेथी पिकाचे हे नुकसान झाले. नुकसानीतून ज्या शेतकऱ्यांचे तरकारी माल वाचला. त्यांना चांगला बाजारभाव मिळत असल्याचे सांगण्यात आले. मागणी जास्त आहे. परंतु पुरवठा तरकारी मालाचा होत नसल्यामुळे बाजार भाव कडाडल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.





