‘आमचे बटाटे खराब होतील, खूप नुकसान होईल…’; नेपाळमध्ये हिंसाचारानंतर 200 हून अधिक भारतीय ट्रक अडकले

नेपाळ – नेपाळमधील भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बंदीविरोधात GEN Z प्रदर्शनकर्त्यांनी केलेल्या हिंसक आंदोलनाचा परिणाम भारत-नेपाळ व्यापारावर होऊ लागला आहे. उत्तर प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या बहराइच, लखीमपुर खीरी आणि महाराजगंज जिल्ह्यांजवळील नेपाळच्या सीमावर्ती भागात हिंसाचार पसरला आहे. यामुळे भारत-नेपाळ सीमेवर 200 हून अधिक ट्रक अडकले असून, त्यात खाद्यपदार्थांचा साठा आहे. हिंसाचाराच्या भीतीने सीमा बंद करण्यात आली आहे.
सोनौली सीमेवर ट्रकांची 8 किमी रांग –
सोनौली सीमेवर ट्रकांची 8 किलोमीटर लांब रांग लागली आहे. नेपाळमधील हिंसक निदर्शनांमुळे काठमांडूसह देशातील प्रमुख शहरांमध्ये लष्कराने सुरक्षा व्यवस्था ताब्यात घेतली आहे. प्रदर्शनकर्त्यांनी संसद भवन, राष्ट्रपती भवन आणि प्रमुख नेत्यांच्या निवासस्थानांना आग लावली. या हिंसाचारात आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला असून, 450 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
उत्तर प्रदेशच्या सीमावर्ती भागातही तणाव –
उत्तर प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या नेपाळच्या सीमावर्ती भागात हिंसाचार पसरला आहे. महाराजगंजजवळील सोनौली शहरात प्रदर्शनकर्त्यांनी सरकारी कार्यालयांना आग लावून तोडफोड केली. या भागात सलग दुसऱ्या दिवशी शाळा आणि व्यवसाय बंद राहिले. सोनौली हे भारत आणि नेपाळ यांच्यातील प्रवासाचे प्रमुख केंद्र आहे.
#WATCH | Uttar Pradesh: Manmohan Yadav, a truck owner stuck at the Sonauli border, says, “Two of my trucks are stuck here. The goods loaded on the truck are sent to Nepal. Around 26 tonnes and 27 tonnes of potatoes are loaded on each truck, respectively. All the potatoes will be… https://t.co/nXNyG2n9PL pic.twitter.com/XecdRUiqJa
— ANI (@ANI) September 10, 2025
ट्रक मालक आणि चालकांचे हाल –
सोनौली सीमेवर अडकलेले ट्रक मालक मनमोहन यादव म्हणाले, “माझे दोन ट्रक इथे अडकले आहेत. प्रत्येक ट्रकमध्ये 26 ते 27 टन बटाटे लादले आहेत. पुढील दोन दिवसांत बटाटे खराब होतील आणि मला 3 लाखांचे नुकसान सहन करावे लागेल. अनेक ट्रकचालक इथे अडकले आहेत. आम्ही मागणी करतो की, सीमा लवकरात लवकर खुली करावी.”ट्रकचालक कन्हैया लाल यादव यांनी ANI शी बोलताना सांगितले, “मी गेल्या 5 दिवसांपासून इथे अडकलेलो आहे. नेपाळमधील मोठ्या निदर्शनांमुळे सीमेवर प्रचंड जाम आहे. सीमा कधी उघडेल, याची काहीच माहिती नाही.”
प्रशासनाचे निर्देश –
उत्तर प्रदेशातील देवीपाटन मंडलाचे आयुक्त शशि लाल भूषण सुशील यांनी बलरामपुर, श्रावस्ती आणि बहराइचच्या जिल्हाधिकाऱ्यांना पोलिस आणि सशस्त्र सीमा बल (एसएसबी) अधिकाऱ्यांसह समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत.
हिंसाचार नियंत्रणात येण्याची प्रतीक्षा –
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत सीमेवरील तणाव कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय व्यापारी आणि ट्रकचालकांना मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागत आहे. सीमा लवकर खुली होण्याची सर्वांना अपेक्षा आहे.




