साखर विक्रीमध्येही दरवाढ गरजेची – कोल्हे

कोपरगाव -सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांनी संघर्ष, संकटे, आव्हाने समर्थपणे पेलुन सहकारी साखर कारखानदारी टिकवून ठेवली. इतर कारखान्यांच्या तुलनेत संजीवनीने आजपर्यंत ऊसाला कधीही कमी भाव दिला नाही. यावर्षीही कोल्हे साखर कारखाना भावात मागे राहणार नाही,असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांनी केले. केंद्र शासनाने एफआरपीची रक्कम ज्याप्रमाणे वाढविली. त्याप्रमाणात साखर विक्रीच्या दरातही वाढ करावी, तरच सहकारी साखर कारखानदारी टिकेल असेही ते म्हणाले.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची 60 वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर सोमवारी झाली. त्यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी शरद पोपटराव शिंदे आडसाली (शहा सिन्नर), बाळासाहेब माधवराव संधान पूर्व हंगामी (दहिवडी सिन्नर), पुंडलिक आनंदा गिते सुरू (संवत्सर), व एकनाथ कचरू गवांदे खोडवा (लक्ष्मणपुर सिन्नर), या सर्वाधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष रमेश घोडेराव संचालक व कार्यकारी संचालक यांनी सभासदांचे स्वागत केले. विषय पत्रिकेवरील सर्व विषय टाळयांच्या गजरात मंजुर करण्यात आले. मागील सभेचे इतिवृत सचिव तुळशीराम कानवडे यांनी वाचले त्यास सभासदांनी मंजुरी दिली..
विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, आज सहकारासमोर खासगीचे आव्हान आहे, अतिरिक्त साखर उत्पादन, ऊसतोडणी कामगारांची कमतरता यासह असंख्य नवनवीन प्रश्न साखर कारखानदारीसमोर निर्माण झाले आहेत. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने पुढाकार घेवुन ऊसतोडणी यंत्र खरेदीस तसेच औषधी व प्रायोगिक प्रकल्प, संशोधन व विकासासाठी अनुदान द्यावे. भविष्यात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचा खर्च कमी करण्यासाठी कारखाना बायो सीएनजीसाठी प्रयत्नशील आहे. घरगुती व उद्योगासाठीच्या साखरेचे दर वेगवेगळे ठरवावेत. साखर कारखानदारीकडे हंगामी उद्योग म्हणून पाहिले जाते मात्र त्याकडे वार्षिक उद्योग कसा होईल, यासाठी सर्वाना प्रयत्न करावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सकारात्मक धोरणामुळे मागील हंगामात भारत सर्वाधिक उत्पादन व निर्यात करणारा देश ठरला आहे. चालु वर्षीही देशात 355 लाख मे.टन विक्रमी साखरेचे उत्पादन होणार असल्याने साखर निर्यातीबाबतचे धोरण आजच जाहीर करून साखर कारखानदारीला दिलासा द्यावा.
उसावरील कीड, त्यावरील उपाययोजना, उसाची परिपक्वता वाढ व रवेज आदि माहिती अत्याधुनिक सॅटेलाईट तंत्रज्ञानातुन ई कृषिच्या माध्यमातुन सभासद शेतकऱ्यांना उपलब्ध करून देवुन देशातील पहिल्या दहा सहकारी साखर कारखानदारीत कोल्हे कारखाना स्थान मिळविल अशी ग्वाही त्यांनी दिली. कोपरगाव तालुक्यात ड वर्ग घरकुल लाभापासून अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचा समावेश पुन्हा करून दिल्याबद्दल विवेक कोल्हे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सुत्रसंचलन व आभार संचालक विश्वासराव महाले यांनी केले.
स्व. कोल्हे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे सहकारी साखर कारखानदारीतील योगदान लक्षात घेवुन त्यांचा पुर्णाकृती पुतळा कारखाना कार्यस्थळावर उभारण्यात यावा,अशी सुचना ऐनवेळच्या विषयात आप्पासाहेब औताडे व रमेश औताडे यांनी केली त्यास सर्व सभासदांनी हात उंचावुन संमती दिली.
निळवंड्याचे पाणी डिसेंबर-जानेवारीपर्यंत
जिरायत भागातील शेतकऱ्यांना निळवंडे धरणाचे पाणी कालव्याद्वारे मिळावे, यासाठी भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे या मंत्रालयात बैठकीसाठी गेल्या असून येत्या डिसेंबर- जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे विवेक कोल्हे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.





