School Stationery Price Hike: शालेय साहित्य खरेदीला दरवाढीची झळ
School Stationery Price Hike: नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर स्टेशनरीच्या दरात वाढ

इनुराद विश्वकर्मा
School Stationery Price Hike: राज्यभरात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असताना शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होत आहे. मात्र यंदा वह्या, पेन, शालेय बॅगा, वॉटर बॉटल, कला साहित्य आणि इतर स्टेशनरी वस्तूंच्या दरात वाढ झाल्याने पालकांच्या खर्चात भर पडली आहे.
व्यापार्यांच्या मते कागद, प्लास्टिक कच्चा माल तसेच वाहतूक खर्च वाढल्यामुळे शालेय साहित्याच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. काही वस्तूंच्या दरात १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
शहरातील स्टेशनरी दुकाने, पुस्तक विक्रेते आणि शैक्षणिक साहित्य विक्री केंद्रांमध्ये गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी व पालकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांची धावपळ सुरू असून वाढत्या किंमतीमुळे शैक्षणिक खर्चाचे गणित बिघडल्याची प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केली.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला स्टेशनरी विक्रेत्यांच्या मते त्यांच्या वार्षिक विक्रीपैकी सुमारे ४० ते ६० टक्के विक्री जून-जुलै महिन्यात होते. स्टेशनरी विक्रेत्यांच्या माहितीनुसार यंदा वह्या, कागद, बॉलपेन आणि इतर शालेय साहित्याच्या दरात सरासरी १० ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
कागदासह विविध कच्च्या मालाच्या किंमतीत झालेली वाढ आणि वाढलेला वाहतूक खर्च यामुळे दरवाढ करावी लागल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मात्र दरवाढीबरोबरच बाजारातील मागणी अपेक्षेप्रमाणे वाढलेली नसून मागील वर्षाच्या तुलनेत विक्रीत सुमारे ४० टक्के घट झाल्याचा दावा काही विक्रेत्यांनी केला आहे.
शिक्षण क्षेत्रात वाढत असलेल्या डिजिटल तंत्रज्ञानाचा स्टेशनरी व्यवसायावर लक्षणीय परिणाम होत असल्याचेही विक्रेत्यांचे म्हणणे आहे. अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये डिजिटल नोट्स, ई-लर्निंग, ऑनलाइन अभ्यास साहित्य आणि स्मार्ट क्लासरूमचा वापर वाढल्याने पारंपरिक स्टेशनरी वस्तूंची गरज काही प्रमाणात कमी झाली आहे.
या बदलाचा स्टेशनरी विक्रीवर जवळपास ५० टक्के परिणाम झाल्याचा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला. असे असले तरी नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीच्या काळात वह्या आणि बॉलपेन यांना सर्वाधिक मागणी असते. विद्यार्थी आणि पालकांकडून या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात असली तरी वाढलेल्या किंमती आणि बदलत्या शैक्षणिक पद्धतींमुळे स्टेशनरी बाजारावर दबाव निर्माण झाला असून यंदाचा हंगाम अपेक्षेपेक्षा काहीसा मंदावलेला असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
जुन्या पुस्तकांची खरेदी-विक्री
शैक्षणिक खर्च कमी करण्यासाठी शहरात जुन्या पुस्तकांच्या खरेदी-विक्रीची परंपरा आजही कायम आहे. शहरातील विविध पुस्तक विक्री केंद्रांमध्ये तसेच महाविद्यालय परिसरात वापरलेली पाठ्यपुस्तके, संदर्भ पुस्तके आणि स्पर्धा परीक्षांची पुस्तके खरेदी-विक्री केली जात आहेत. नवीन पुस्तकांच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर जुन्या पुस्तकांना मोठी मागणी आहे.
परंतु यंदा इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या अभ्यासक्रमात बदल झाल्याने या वर्गांच्या जुन्या पुस्तकांची मागणी मर्यादित राहण्याची शक्यता असून, इतर वर्गांमध्ये मात्र जुन्या पुस्तकांच्या खरेदी-विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कोरियन, जपानी शैलीच्या साहित्याचा ट्रेंड
जेल पेन, हायलाइटर्स, कलर मार्कर्स, स्टिकी नोट्स, ॲस्थेटिक नोटबुक्स, कार्टून थीम असलेले लेखन साहित्य आणि विविध प्रकारच्या अभ्यास साहित्याला मोठी मागणी आहे.
सोशल मीडियावरील अभ्यासविषयक व्हिडिओ, स्टडी ग्राम आणि स्टडी विथ मी यांसारख्या ट्रेंडमुळेही या आधुनिक स्टेशनरी उत्पादनांची लोकप्रियता वाढली आहे. सध्या आकर्षक डिझाइन असलेल्या नोटबुक्स, मल्टीकलर पेन, हायलाइटर्स आणि कोरियन-जपानी शैलीतील अभ्यास साहित्य हे विद्यार्थ्यांमध्ये विशेष ट्रेंडमध्ये असल्याचे विक्रेते सांगतात.
बाजारात नवे बदल
स्टेशनरी आणि शैक्षणिक साहित्याच्या वाढलेल्या दरांमुळे पालकांवरील आर्थिक भार वाढला असला तरी शिक्षणासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. एकीकडे शैक्षणिक साहित्याच्या वाढत्या किंमती आणि दुसरीकडे डिजिटल शिक्षणाचा वाढता प्रभाव यामुळे स्टेशनरी बाजार नव्या बदलांना सामोरे जात आहे.
तरीही शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या वह्या, पुस्तके आणि लेखन साहित्याची गरज कायम असल्याने या क्षेत्राचे महत्त्व अबाधित आहे. दरवाढीचा आर्थिक भार सहन करत पालक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्राधान्य देत असल्याचे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे.
हेही वाचा:
Karad: कृष्णा कारखान्यासाठी ‘सहकार-संस्थापक’मध्ये लढत, 44 उमेदवार रिंगणात, आज होणार चिन्हवाटप





