President Election : द्रौपदी मुर्मु यांनी घेतली मोदी- शहांची भेट
Updated On:

नवी दिल्ली – राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु राजधानी दिल्लीत दाखल झाल्या असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची आज भेट घेतली. त्या दिल्लीत आल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
मुर्मु उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार असून विरोधी पक्षांनी संयुक्तपणे माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे.
दरम्यान, बीजू जनता दल सोबतच मेघालय डेमोक्रॅटीक अलायन्सनेही मुर्मु यांच्या उमेदवारीला आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे मुर्मु यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जाते आहे.





