डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले नेतान्याहू यांना भेटीचे निमंत्रण

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना पुढील आठवड्यात व्हाईट हाऊसमध्ये बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. आपण पुढील महिन्याच्या ४ तारखेला अमेरिकेच्या अध्यक्षांना भेटणार आहेत, असे नेतान्याहू यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.
इस्रायल आणि त्याच्या शेजारी देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याबाबत आणि सामायिक शत्रूंचा सामना करण्याच्या प्रयत्नांवर चर्चा करण्यासाठी ट्रम्प यांनी नेतान्याहू यांना हे निमंत्रण दिले आहे. ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर व्हाईट हाऊसला भेट देणारे नेतान्याहू हे पहिले परदेशी नेते असतील.
दरम्यान इस्रायलने संयुक्त राष्ट्रांच्या पॅलेस्टिनी मदत एजन्सी सोबतचे सर्व संबंध तोडण्याची घोषणा केली आहे. उद्यापासून इस्रायली भूभागावर संघटनेच्या कामकाजाला बंदी लागू होणार आहे.
यूएनआरडब्लूए ही संयुक्त राष्ट्रांची एजन्सी व्याप्त पॅलेस्टिनी प्रदेशांना आरोग्यसेवा आणि शिक्षण प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. सध्याच्या युद्धाच्या सुरुवातीपासून गाझा पट्टीला पोहोचवलेल्या एकूण अन्न मदतीपैकी ६० टक्के अन्न पुरवठा केल्याचा दावा या संघटनेने केला आहे.
इस्रायलने सातत्याने यूएनआरडब्लूएवर त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याचा आरोप केला आहे आणि ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हमासने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात या संस्थेची भूमिका असल्याचा आरोप केला आहे.
हल्ल्यात १,२०० हून अधिक इस्रायली मृत्युमुखी पडले आणि २५० जणांना ओलिस ठेवण्यात आले होते. हमासने केलेल्या हल्ल्याला या एजन्सीकडून सहाय्य मिळाल्याच्या आरोपावरून इस्रायलने ही बंदी घातली आहे. दज्धाच्या प्रारंभीच्या काळात या एजन्सीच्या कार्यालयावर इस्रायलने छापे देखील घातले होते.





