नगर | जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांची संजीवनीस भेट

कोपरगाव, (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष व जिल्हा सहकारी कॉटन मार्केटींग फेडरेशनचे विभागीय संचालक संजय मुरलीधर पवार यांनी नुकतीच संजीवनी उद्योग समुहास भेट देऊन पाहणी केली. तसेच त्यांची महाराष्ट्र स्टेट मार्केटींग फेडरेशन (मुंबई) च्या संचालकपदी नाशिक विभागातून नुकतीच बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा संजीवनीचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याअंतर्गत विविध प्रकल्पांची बिपीन कोल्हे यांनी माहिती देऊन कारखान्याने देशात सर्वप्रथम ज्युसपासून इथेनॉल तयार करण्यात नावलौकीक मिळविला असल्याचे सांगितले. सत्कारास उत्तर देताना संजय पवार म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी खुल्या अर्थव्यवस्थेत निर्माण होणारी आव्हाने, शेतकऱ्यांचे प्रति हेक्टरी उसासह अन्य पीक उत्पादन वाढ कार्यकम,
आसवनी व त्यावर आधारीत उपपदार्थ निर्मिती, बायोगॅस, सहवीज, हायड्रोजन ऊर्जा निर्मिती इत्यादीबाबत देशातील साखर उद्योगाला आधुनिकीकरणाची जोड देत जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांची तिसरी पिढी अत्यंत कुशाग्र व हुशार असून, सहकारासमोर निर्माण होणारी आव्हाने सोडविण्यासाठी त्यांचे काम सुरूआहे.
संजीवनी ही ग्रामीण अर्थकारणाची कामधेनू आहे. कारखाना अंतर्गत नव्याने अद्यावत बनवलेल्या प्रशासकीय इमारतीचे सुरू असलेले काम पाहून संजय पवार यांनी गौरवोद्गार काढले.





