सुवा (फिजी) – फिजीच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आज फिजीमधील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले. भारत आणि फिजीदरम्यानच्या घनिष्ठ संबंधांचे त्यांनी कौतुक केले. एक मजबूत, लवचिक आणि अधिक समृद्ध राष्ट्र निर्माण करण्यासाठी फिजीसोबत भागीदारी करण्यास भारत तयार आहे, असे त्या यावेळी म्हणाल्या. फिजीचे अध्यक्ष रातू विलियम मैवाली काटोनिवेरे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी प्रदान केले. हा फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, असे राष्ट्रपतींच्या कार्यालयाने एक्सवर पोस्ट केलेल्या वृत्तात म्हटले आहे.फिजीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या मुर्मू यांनी हा सन्मान भारत आणि फिजी यांच्यातील मैत्रीच्या सखोल संबंधांचे प्रतिबिंब असल्याचे म्हटले आहे. फिजीला भारतीय राष्ट्रप्रमुखाची ही पहिलीच भेट आहे. राष्ट्रपती मुर्मू यांनी फिजीच्या संसदेलाही संबोधित केले. जागतिक व्यासपीठावर भारताचा सक्षमपणे उदय होत असताना भारताला फिजीबरोबर भागीदारी करायची आहे. फिजीच्या प्राधान्यक्रमानुसार एक मजबूत, अधिक लवचिक आणि अधिक समृद्ध राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपल्या दोन्ही प्रिय देशांच्या लोकांच्या परस्पर फायद्यासाठी आपल्या भागीदारीतील पूर्ण क्षमतांचा वापर करण्यासाठी आपण एकत्र येऊ या, असे त्या यावेळी म्हणाल्या. आकारात मोठा फरक असूनही भारत आणि फिजीमध्ये लोकशाहीसारखी अनेक साधर्म्य आहेत. सुमारे १० वर्षांंपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिजीच्या दौऱ्यादरम्यान बोलताना दोन्ही देशांना एकत्रित बांधणाऱ्या लोकशाही, समाजातील वैविध्य, सर्व मानव समान असल्याची वैचारिक शिकवण आणि स्वातंत्र्याप्रती असलेली बांधिलकी या समान मूल्ल्यांना अधोरेखित केले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली. फिजीची जीवनशैली, परंपरा आणि चालीरीतींबद्दल खोलवर रुजलेला आदर, खुले आणि बहुसांस्कृतिक वातावरण हेच फिजीला वाढत्या संघर्षग्रस्त जगात इतके खास बनवते, असे राष्ट्रपती म्हणाल्या. सुवा येथे स्थापन करण्यात येणाऱ्या सुपर स्पेशालिटी कार्डिओलॉजी हॉस्पिटलसह नव्याने घोषित केलेले प्रकल्प फिजी आणि व्यापक प्रशांत प्रदेशातील लोकांच्या प्राधान्याच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.