मुंबईत मनसेच्या मोर्चाची तयारी जोरात
नाक्यानाक्यांवर बॅनर ः 1 ते 2 लाख लोक येण्याची शक्यता
मुंबई : पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोऱ्यांविरोधात उद्या मनसेचा मुंबईत मोर्चा होणार आहे. हा मोर्चा गिरगाव ते आझाद मैदान निघणार आहे. यासाठी आझाद मैदानात मोठा स्टेजही बांधण्यात आला आहे. केवळ मुंबईतूनच नाही तर ठाणे, नाशिक, पुण्यातूनही मनसेचे कार्यकर्तेही मुंबईत मोर्चासाठी धडकणार आहेत. राज्यभरातून 1 ते 2 लाख लोक मोर्चासाठी येण्याची शक्यता आहे. आझाद मैदानावर तयारी सुरु तर नाशिकमधून 10 हजार झेंडे मुंबईकडे रवाना केले आहेत.
पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरुद्धचा मोर्चा अभूतपूर्व करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, नाशिक आणि राज्यभरातल्या इतरही प्रमुख शहरात मनसेची जय्यत तयारी सुरु आहे. मुंबईतल्या नाक्यानाक्यांवर मनसेचे बॅनर लागले आहेत. रस्ते आणि उड्डाणपूल मनसेच्या झेंड्यांनी भगवे झाले आहेत.
मोर्चात सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते घरोघरी जाऊन पत्रकं वाटत आहेत. लोकांना मोर्च्यात सामील होण्याचं आवाहन केले जाते आहे. मनसे कार्यकर्त्यांनी प्रत्येक चौकात बूथ तयार केले आहेत. मोर्चा कसा निघणार याची माहिती ते लोकांना देत आहेत. फिरत्या गाड्यांमधूनही लोकांना मोर्चात सामील होण्याचे आवाहन केले जात आहे.
दुसरीकडे नाशिकच्या मनसे कार्यकर्त्यांनीही जय्यत तयारी केली आहे. त्यांनी 10 हजार झेंडे तयार केले आहेत. शिवमुद्रा असलेले झेंडे कार्यकर्त्यांना दिले जाणार आहेत. कार्यकर्त्यांनी अँम्ब्युलन्सचीही तयारी केली आहे. दुपारी 12 वाजता हिंदू जिमखान्यापासून मोर्चा सुरु होणार आहे. कार्यकर्त्यांसाठी पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे.





