नवीन महाबळेश्वरसाठी पर्यावरणस्नेही पर्यटनाभिमुख योजनेसाठी बैठकांचे करण्यात येणार आयोजन

कोयनानगर : पर्यटन क्षेत्रात माईलस्टोन ठरणारा नवीन महाबळेश्वर प्रकल्प गतीने उभा राहत आहे. प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या चार तालुक्यातील गावांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी या बहुउद्देशीय प्रकल्पाचे शासन नियुक्त विकासक नियोजन प्राधिकरण असणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत २३५ गावांच्या बैठकीचे आयोजन २३ व २४ जुलै रोजी आयोजित केले असल्याची माहिती उपमुख्य नियोजनकार तथा नगररचनाधिकारी उदय चंदर डी. यांनी दिली.
महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाच्या शेजारीच नवीन महाबळेश्वर गिरिस्थान निर्माण करण्याच्या प्रकल्पाने गती घेतली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या प्रकल्पातील २३५ गावांचा बेस मॅप यापूर्वीच तयार केला आहे. आता या भागाची प्रारूप विकास योजना करणे बाकी आहे. हा प्रारूप तयार करताना या प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावातील जनतेला विश्वासात घेऊन त्यांच्याकडुन या प्रकल्पासाठी पर्यावरणस्नेही व पर्यटनभिमुख विकास योजनांचा समावेश या प्रकल्पात करण्यात येणार आहे.
कोयना बॅक वॉटर आणि परिसरातील तब्बल २३५ गावांचा विकास साधून नवीन महाबळेश्वर वसविले जाणार आहे. यामध्ये सातारा तालुक्यातील ३४, पाटण तालुक्यातील ९५, जावळी तालुक्यातील ४६ आणि महाबळेश्वर तालुक्यातील ६० गावांचा समावेश आहे. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी ‘एमएसआरडीसी’ची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून २०१९ मध्ये नियुक्ती केली होती. सातारा जिल्ह्यातील सुमारे ७४८ चौरस किमी क्षेत्रासाठी ही योजना तयार केली जात असून, सांगली जिल्ह्याच्या हद्दीपासून ते महाबळेश्वरपर्यंत हा परिसर विस्तारला आहे.‘
‘एमएसआरडीसी’ने या भागाचा बेस मॅप तयार केला आहे. आता या भागातील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या सूचना घेतल्या जाणार आहेत. या सूचनांच्या विचारात घेऊन विकास योजना तयार केली जाणार आहे. त्यातून ती सर्वसामावेशक बनण्यास मदत मिळेल, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. स्थानिकांना सूचना मांडण्यासाठी महाबळेश्वर आणि जावळी तालुक्यात २२ जुलैला दोन्ही ठिकाणच्या पंचायत समितीत, तर सातारा आणि पाटण तालुक्यात ३ जुलैला त्या त्या पंचायत समित्यांत तालुकानिहाय गावांच्या बैठकीचे आयोजन केले आहे.





