Satara News : निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सातारा (Satara News) जिल्ह्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नकाशावर मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी आणि जिल्ह्याला ‘पर्यटन हब’ बनविण्यासाठी आणि स्थानिक भूमिपुत्रांना स्थानिक ठिकाणीच काम मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. डिसेंबर- जानेवारीमध्ये कोयना बॅकवॉटर फेस्टिव्हलचे आयोजन केले जाणार आहे. हा महोत्सव जागतिक दर्जाचा करण्यासाठी (Satara News) शासन प्रयत्नशील आहे. कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचा सांगता समारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी कोयना नदीवरील सांगवड येथील मोठ्या पुलाचे, दौलतनगर येथील शिवदौलत स्टेडियम व महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकातील संगीत कारंजे व लेझर शोचे, तसेच कै. शिवाजीराव देसाई स्मृती भवनाचे उद्घाटन करण्यात आले. पापर्डे येथील जल पर्यटन केंद्राचे उद्घाटनही दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी शिंदे बोलत होते. पालकमंत्री (Satara News) शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रभारी पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, पर्यटन संचालक बी. एन. पाटील, व्यवस्थापक निलेश घटने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई उपस्थित होते. Eknath Shinde उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘पर्यटन विकासासाठी व महाबळेश्वरवरील पर्यटकांचा ताण कमी करण्यासाठी आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नवीन महाबळेश्वर विकसित केले जात आहे. यामुळे स्थानिकांच्या जमिनींना चांगला भाव मिळेल आणि पर्यटनाला मोठी चालना मिळेल. शेतकरी आणि युवकांसाठी क्लस्टर शेती उपक्रम राबविला जात आहे. त्यामुळे कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेता येईल. बांबूला आता गवत वर्गात समाविष्ट केल्याने त्याच्या लागवडीसाठी मनरेगातून अनुदान दिले जात आहे. सातारा जिल्ह्यात सुमारे आठ हजार एकरवर बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. बोंडारवाडी धरणाच्या कामाला चालना देण्यात येईल, सातारा एमआयडीसी मध्ये चांगले उद्योग आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजनाही प्राधान्याने राबविली जाईल.’’ पालकमंत्री देसाई म्हणाले, ‘‘डोंगरी महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पुढील वर्षापासून या महोत्सवाचा कालावधी वाढवण्याची नागरिकांची मागणी आहे. या महोत्सवात कृषी प्रदर्शन, बचत गटांचा मेळावा, पोवाडे, भजन, ब्रास बँड यांसह विविध कार्यक्रमांच्या आयोजनाबरोबरच दररोज सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच तारळी धरणातील ‘शंभर हेड’वरून शेतकऱ्यांना पाणी देणे शक्य झाले. मोरणा- गुरेघर धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. याचा फायदा दोन्ही तीरांवरील शेतकऱ्यांना झाला आहे.’’ यापुढील काळातही पाटण तालुक्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यशराज देसाई यांनी आभार मानले. जिल्ह्याला निधी कमी पडू देणार नाही आपली बांधिलकी सर्वसामान्य लोकांशी आहे. त्यातूनच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आहे, असे सांगून शिंदे यांनी ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, अशी ग्वाही दिली. ई- केवायसीसठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकरी सन्मान ‘नमो शेतकरी सन्मान योजने’द्वारे शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजार रुपये (केंद्र व राज्य सरकार मिळून) दिले जात आहेत. ‘मी उपमुख्यमंत्री असलो, तरी शेवटी सातारचा एक सामान्य शेतकरीपुत्र आणि कार्यकर्ता आहे. लोकांच्या कामासाठी आणि जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता कधीही भासू देणार नाही.’