पुणे जिल्हा | वीसगाव खो्रयात पेरणी पूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात

वीसगाव खोरे, (वार्ताहर) – भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सलग पाच सहा दिवस पाऊस पडल्याने खरीप हंगामातील पेरणी पूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या सुरुवातीलाच शेणखत शेतात टाकून ठेवले होते.
आजही ग्रामीण भागात ट्रॅक्टरऐवजी बैलजोडीचा वापर करून शेतीच्या मशागतीला प्राधान्य दिले जाते. शेताच्या बांधावर असलेली, मशागत करताना पिकाच्या वाढीला अडथळा करणारी झुडपे तोडून बांधावरील गवत, काडीकचरा, झुडुपे कापून जाळून शेती योग्य जमीन तयार केली जाते.
खरीप पिकांच्या लागवडीची पूर्वतयारी म्हणून नांगरट, ढेकळे फोडणे, कुळविणे, धसकट वेचणे, जमिनीचे सपाटीकरण करणे आणि सरी किंवा वाफे तयार करणे इत्यादी कामे करून पेरणी योग्य जमीन तयार करून ठेवली आहे.गेले दोन दिवसात मुसळधार पाऊस पडल्याने जमिनीला घात येवून पेरणी करता शेतकरी वाट पाहत आहे.
शेतकरी पारंपरिक पद्धतीने बैलांच्या सहाय्याने शेतीची कामे करतात कारण जेव्हा ट्रॅक्टरने नांगरट केली जाते. तेव्हा ती खोलवर केली जाते. त्यामुळे जमिनीतील माती वर येते. तसेच शेतातील तण काढले जातात. परंतु हे तण परत गाडले जात असल्याने पुन्हा उगवतात.
परंतु बैलांच्या साहाय्याने नांगरट करताना शेतकरी तण निघाल्यावर ते तण (वशान) औत थांबवून बाजूला काढतात. त्यामुळे तण एका जाग्यावरुन दुसरीकडे जात नाहीत काढलेलं तण शेतकरी शेतात बाहेर काढून टाकतो. त्यामुळे तण नियंत्रणासाठी मदत होते. – संजय किसन शिवतरे, प्रगतशील शेतकरी





