Pune District : खरीप हंगामातील मका पिकाची लागवड अंतिम टप्प्यात

-इंदापूर तालुक्यातील चित्र
लोणी देवकर – इंदापूर तालुक्यामध्ये नुकत्याच झालेल्या समाधानकारक अवकाळी पावसाने तसेच नंतरच्या मान्सूनच्या पावसाने शेतकरी वर्गामध्ये सध्या आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर खरीप हंगामातील मका पिकाची लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, इंदापूर तालुक्यामध्ये चालू खरीप हंगामामध्ये मका पिकाखालील क्षेत्रात मोठी वाढ झाल्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.
गेली सुमारे तीन ते चार आठवड्यांपासून जमिनीतील ओलाव्याचा फायदा घेत शेतकरी वर्गाने मका पिकाच्या लागवडीसाठी लगबग सुरू केली. सध्या अनेक ठिकाणी लागवड केलेले मक्याचे पीक चांगले उगवूनही आलेले आहे. या उगवून आलेल्या मका पिकाला पाण्याची आवश्यकता असल्याने, शेतकरी वर्ग सध्या पावसाच्या प्रतिक्षेत असल्याचे मका उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना अवघ्या ४ महिन्यामध्ये हमखास उत्पन्न देणारे व बाजारामध्ये चांगला हमीभाव मिळणारे पीक म्हणून मक्याची ओळख आहे. सध्या जमिनीच्या पाण्याची पातळीत मोठी वाढ झाल्याने, मका पिकासाठी वेळेवरती पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे खरीप हंगामात मक्याचे उत्पादन भरघोस निघणार असून, जनावरांनाही चारा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. वर्षभरात तिन्ही हंगामात मक्याचे पीक घेतले जाते.
या पिकाने शेतकरी वर्गाला गेली तीन- चार दशकापासून मोठा आर्थिक आधार दिला आहे. मात्र, गेल्या आठ-दहा वर्षांपासून मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत असल्याने कीटकनाशक औषधांच्या फवारणीच्या खर्चात वाढ झाल्याचे मका उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, सध्या समाधानकारक पाऊस झाल्याने कृषी सेवा केंद्रामधून खरीप हंगामातील बाजरी, तूर, सोयाबीन, उडीद, कांदा आदी बियाण्यास मोठी मागणी असल्याचे कृषी सेवा केंद्र चालकांनी सांगितले.





