वरंधा घाट ठरतोय वळणांवरील काळ ; 723 कोटी 13 लाखांसाठी प्रक्रिया अंतिम टप्प्यात

केंद्रीय रस्ते विकासतर्फे निधी मंजूर
जुलै ते ऑक्टोबर चार बळी
घाट रस्त्याला कामाची प्रतीक्षा
पुणे – अतिपावसाचे ठिकाण आणि सातत्याने दरडी कोसळत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने वरंधा घाट यंदा पावसाळ्यातजुलै महिन्यात 30 सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
मात्र, यंदा पावसाचे प्रमाण तुलनेने कमी झाल्याने 25 ऑगस्टपासून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, घाट रस्त्याने वाहतूक सुरू झाली आणि गेल्या अडीच महिन्यांपासून येथे अपघातांचे सत्र सुरू झाले. 29 जुलै ते 10 ऑक्टोबर या कालावधीत 4 जणांचा मृत्यू झाला, 16 जण जखमी झाले.
भोर मार्गे कोकणात जाणारा महत्त्वाचा आणि जवळचा मार्ग असलेला वरंधा घाट कावळ्या किल्ल्याला दुभंगून कोकणात उतरतो. घाट 20 किलोमीटरचा असून, संपूर्ण रस्ता डोंगरी वळणाचा आहे.
कोकणच्या दिशेला सुमारे 3 हजार फूट खोल दरी आहे, याचबरोबर या रस्त्यावर अनेक धोकादायक वळणे आहेत. भोरपासून घाटातील वाघजाई मंदिरापर्यंतच्या 47 कि. मी. रस्ता भोरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी शिंदवाडी फाटा (ता. खंडाळा, जि. सातारा) ते वरंधा घाट या 57.45 कि. मी.च्या रस्त्यासाठी 723 कोटी 13 लाखांचा निधी मंजूर केल्याचे जानेवारी 2023 मध्येच जाहीर केले होते. त्यानुसार रस्त्याच्या दुरुस्तीबाबत नियोजनही करण्यात आल.
हा घाटरस्ता दोन लेनचा करणे, त्यासाठी 10.14 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करणे, सध्या असलेल्या दोन पुलांच्या पुनर्बांधणीसह दोन नवे मोठे पूल आणि छोटे 20 पूल बांधणे असे नियोजन असून, हा रस्ता तयार झाल्यावर टोलही आकरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या रस्त्यावर सुमारे 12 कि. मी.चे अंतर हे पूर्णतः वळणाचे आहे. मार्गावर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावले आहेत. 2021 च्या अतिवृष्टीनंतर मार्गाची दुरुस्ती करून अनेक ठिकाणी संरक्षक भिंती तयार केल्या आहेत. वळणे कमी करण्याचा प्रयत्नही केला आहे; पण रस्ता चांगला झाला असल्याने येथे वाहनांची गती वाढली आहे. त्यामुळे वाहने चालवताना त्यावरील नियंत्रण सुटून हे अपघात होत आहेत. या रस्त्यासाठी केंद्रीय महामार्गाचा निधी मंजूर असून, त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
संजय वागज, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, भोर
वरंधा घाटात धुके, अंधार आणि वेगावर नसलेले नियंत्रण हे अपघातासाठी कारण ठरत आहेत. घाटात 30 कि. मी. वेगमर्यादा आहे; पण त्याचे पालन होत नाही. वाहनचालकांचे दिशादर्शक फलकांकडे दुर्लक्ष होते. घाटात अत्यंत कमी अंतरावर वळणे आहेत, नवख्या चालकांना ते लक्षात येत नाही. सध्या पहाटे 7 पर्यंत धुके असते, त्यामुळे रात्री अंधारात आणि धुक्यात गाडी चालवणे शक्यतो टाळावे. या ठिकाणी अपघात झाले तर रेस्क्यू करणेही अवघड होते.
शंकर पाटील, पोलीस निरीक्षक, भोर
2021 अतिवृष्टीनंतर 6 कोटींचे काम
या घाटात 2021 च्या अतिवृष्टीनंतर 6 कोटी रुपये खर्च करून संरक्षक कठडे बसवणे, धोकादायक वळणे कमी करणे, साईडपट्ट्या तयार करणे, रस्त्यावर पांढरे पट्टे मारणे आणि दिशादर्शक फलक लावणे आदी कामे करण्यात आली आहेत.



