Pune District : प्रवीण माने यशवंत मानेंमुळे समीकरणे बदलणार: इंदापूर तालुक्यात भाजपचे स्थानिक कार्यकर्त्यांचे जाळे बळकट

इंदापूर : इंदापूर तालुक्यात सत्तेचे गणित बदलणारे नवे राजकीय समीकरण आकार घेत आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पक्षाला नवे बळ दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने तालुक्यात संघटन बळकट केले. तर, दुसरीकडे आता मोहोळचे माजी आमदार यशवंतराव माने यांच्या भाजप प्रवेशाने सोलापूरसह इंदापुरात राजकीय भूकंप घडवून आणला आहे.
यशवंत माने हे मुळचे इंदापूर तालुक्यातील शेळगावचे सुपुत्र असून, त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या काळात त्यांनी शेतकरी वर्गाशी घट्ट संबंध निर्माण केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार गटात असताना त्यांनी गावोगावी ठोस संपर्क व ऋणानुबंध निर्माण केले होते. हाच त्यांचा मजबूत जनाधार आता भाजपला लाभणार आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
नुकत्याच इंदापूर विश्रामगृहात झालेल्या कार्यक्रमात भाजप पदाधिकाऱ्यांनी यशवंत माने यांचा भव्य सत्कार करून स्वागत केले. या वेळी प्रवीण माने, तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, सोनाई परिवारातील कार्यकर्ते व असंख्य भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रवेशानंतर इंदापूर तालुक्यात भाजपचे राजकीय गणित पूर्णपणे बदलले असून,स्थानिक पातळीवर नव्या शक्तीचा उदय झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
भाजपचे राजकीय बळ वाढणार…
राजकारणातील जाणकारांचे म्हणणे आहे की, “प्रवीण माने आणि यशवंत माने हे दोघे एकत्र आले असल्याने,इंदापूर तालुक्यातील आगामी निवडणुकांमध्ये अनेकांची झोप उडाली आहे.” माजी आमदार यशवंतराव माने यांचे इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांशी असलेले जुने संबंध, कृषी बाजार समितीतील अनुभव आणि ग्रामपातळीवरील पकड, यामुळे भाजपला ग्रामीण भागात नवे राजकीय बळ मिळण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये आता दोन माने या दुहेरी दमदार प्रवेशाने पक्षाच्या कार्यकर्त्यांत नवा उत्साह,आत्मविश्वास आणि संघटनशक्ती संचारली आहे.





