Team India : टीम इंडियाला मोठा झटका; प्रतिका रावल बाहेर, ‘या’ धडाकेबाज खेळाडूची वर्ल्ड कप स्क्वॉडमध्ये एन्ट्री!

Pratika Rawal Injured Shafali Verma Replaces : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 मधील सेमीफायनल सामन्याला २९ ऑक्टोबरला सुरुवात होणार आहे. दुसरा सेमीफायनल सामना 30 ऑक्टोबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणार आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर फलंदाज प्रतिका रावल दुखापतग्रस्त होऊन स्पर्धेतून बाहेर पडली आहे. तिच्या जागी आता शफाली वर्माला भारतीय विश्वचषक संघात स्थान देण्यात आले आहे.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात प्रतिकाला झाली दुखापत
26 ऑक्टोबर रोजी भारतीय महिला संघाने बांगलादेशविरुद्ध साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना खेळला. हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या सामन्यादरम्यान बांगलादेशच्या डावातील 21व्या षटकात दीप्ती शर्माच्या चेंडूवर शर्मिन अख्तरने मिडविकेटच्या दिशेने फटका मारला. हा चेंडू अडवण्यासाठी प्रतिका रावलने डाव्या बाजूला झेप घेतली, परंतु तिचा पाय अचानक घसरला आणि तिचा घोट्याला गंभीर दुखापत झाली.
🚨Double Blow for Indian Cricket! 💔
First #ShreyasIyer Now #PratikaRawal
Not going good for Indian Cricket… God bless Them🙏🙏 pic.twitter.com/UMfyfBn1CT
— Er.Rajiv (@Rajiv_siait) October 27, 2025
यानंतर तिला तीव्र वेदना होत असल्याचे दिसले. सामन्याच्या मैदानातून तिला सपोर्ट स्टाफच्या मदतीने बाहेर नेण्यात आले. आपल्या कारकिर्दीतील पहिलाच एकदिवसीय विश्वचषक खेळणाऱ्या प्रतिकाने या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. तिने 7 सामन्यांत 308 धावा केल्या, ज्यात एक शतक आणि एक अर्धशतक यांचा समावेश आहे.
हेही वाचा – Rohit Sharma : ‘मला वाटतं शुबमन आणि…’, रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया सोडण्यापूर्वी गौतम गंभीर काय म्हणाला?
शफाली वर्माला मिळाली संधी –
महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 साठी भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हा शफाली वर्माला मुख्य संघात किंवा राखीव खेळाडूंमध्येही स्थान मिळाले नव्हते. आता प्रतिका रावलच्या जागी बदली खेळाडू म्हणून समाविष्ट झालेल्या शफालीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी आहे. शेफालीने आपला शेवटचा एकदिवसीय सामना ऑक्टोबर 2024 मध्ये खेळला होता.
तिच्या एकदिवसीय कारकिर्दीचा विचार केला तर, तिने आतापर्यंत 29 सामन्यांत 23 च्या सरासरीने 644 धावा केल्या आहेत, ज्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्धच्या या लढतीत शफाली वर्माला तिच्या आक्रमक फलंदाजीने भारतीय संघाला मजबूत सुरुवात करून देण्याची जबाबदारी असेल. भारतीय संघ आणि चाहत्यांना आता शफालीकडून मोठ्या अपेक्षा आहेत.





