IND vs AUS : रोहित-अय्यर यांच्यात मैदानावरच जुंपली! नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

IND vs AUS Rohit Shreyas on field argument : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 264 धावांचा आव्हानात्मक स्कोअर उभारला. रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकी खेळी करत भारतीय डावाला आकार दिला. मात्र, सामन्यादरम्यान रोहित आणि अय्यर यांच्यात एक धाव घेण्यावरून झालेला वाद सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
रोहित-अय्यर यांच्यात जुंपली –
जोश हेझलवुडच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने बचावात्मक फटका खेळला आणि धावा घेण्यासाठी पुढे सरसावला. मात्र, दुसऱ्या टोकाला असलेल्या श्रेयस अय्यरने धाव घेण्यास नकार दिला. यानंतर रोहितने अय्यरला धाव घेणे शक्य असल्याचे समजावण्याचा प्रयत्न केला. स्टंप माइकमध्ये कैद झालेल्या या संभाषणात दोघांमधील चर्चा वादात बदलल्याचे दिसले. त्यांचे संभाषण खालीलप्रमाणे:
Stump mic captures Rohit Sharma vs Shreyas Iyer 🤣🙌
Whose call was it really?✍🏻👇#AUSvIND 👉 2nd ODI | LIVE NOW 👉 https://t.co/dfQTtniylt pic.twitter.com/YipS5K9ioa
— Star Sports (@StarSportsIndia) October 23, 2025
रोहित : अरे श्रेयस, ही धाव होती.
अय्यर : तुम्ही घेऊन बघा, परत मला बोलू नका.
रोहित : अरे, तुला कॉल करावा लागेल, तो सातवं षटक टाकतोय यार.
अय्यर : मला कळत नाही तो कोणत्या अँगलने धावतोय. तुम्हीच कॉल करा.
रोहित : मी हा कॉल करू शकत नाही.
अय्यर : तुमच्या समोर आहे.
हेही वाचा – Pakistan Cricket Team : बाबर आझम, नसीम शाह यांचे टी-20 संघात दमदार पुनरागमन!
भारताची फलंदाजी: रोहित-अय्यर यांची भागीदारी –
भारतीय संघाची सुरुवात खराब झाली होती. अवघ्या 17 धावांवर दोन गडी बाद झाले होते. यानंतर रोहित आणि अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी 118 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. रोहितने 97 चेंडूंमध्ये 73 धावांची खणखणीत खेळी केली, तर अय्यरने 61 धावांचे योगदान दिले. अक्षर पटेलने 41 चेंडूंमध्ये 44 धावांची झुंजार खेळी केली, तर हर्षित राणाने शेवटच्या षटकांमध्ये 24 धावांचा मोलाचा वाटा उचलत भारताला 264 धावांपर्यंत मजल मारून दिली.
कोहली-गिल यांची निराशाजनक कामगिरी –
भारताचा कर्णधार शुबमन गिल आणि माजी कर्णधार विराट कोहली यांनी पुन्हा एकदा निराशा केली. गिल 9 चेंडूंमध्ये 9 धावा काढून बाद झाला, तर कोहली सलग दुसऱ्या सामन्यात खाते न उघडताच (4 चेंडू) पॅव्हेलियनमध्ये परतला. याशिवाय, केएल राहुललाही फारशी चमक दाखवता आली नाही; त्याने 11 धावांचे योगदान दिले.
हेही वाचा – SA vs PAK : दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तानात ऐतिहासिक विजय! १८ वर्षांनंतर कसोटीत केला खास पराक्रम
रोहित आणि अय्यर यांच्या खेळीमुळे भारताने सन्मानजनक धावसंख्या उभारली असली, तरी कोहली आणि गिल यांच्या सातत्यपूर्ण अपयशामुळे चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. दुसरीकडे, रोहित-अय्यर यांच्यातील वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, याबाबत चाहत्यांमध्येही चर्चा रंगली आहे. आता ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





